दैनिक स्थैर्य । दि. २५ जुलै २०२२ । मुंबई । भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नागपूर जिल्ह्यातील द्रोणाचार्य, अर्जुन, शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त तसेच राज्य व राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त खेळाडूंचा भावपूर्ण सोहळा शनिवारी सायंकाळी मानकापूर क्रीडा स्टेडियममध्ये रंगला. गेल्या अनेक वर्षांपासून नागपूरला विविध क्रीडा प्रकारात वैभव प्राप्त करुन देणारे खेळाडू, प्रशिक्षक, वृत्त संकलन करणारे क्रीडा पत्रकार या सोहळ्याला उपस्थित होते. जिल्हाधिकारी आर. विमला यांनी यावेळी प्रत्येक खेळाडूंचे स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला.
व्यासपीठावर द्रोणाचार्य पुरस्कार विजेते मुनीश्वर, उपसंचालक क्रीडा शेखर पाटील, विम्स हॉस्पिटलचे डॉ. आशिष बदखल, डॉ. नेहा बदखल, डॉ. ईशा कुमारी, जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक उपस्थित होत्या. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी आर. विमला यांनी नागपूर मधील इतक्या मोठ्या संख्येने शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडूंशी संवाद साधताना आनंद होत आहे. नागपूरमध्ये राष्ट्रीय स्तरावरचे खेळाडू निर्माण होण्याची जिद्द आहे. पायाभूत सुविधा व त्यासाठी कार्य करणाऱ्या संघटना आहेत. क्रीडा क्षेत्रातही उत्तम करिअर घडू शकते. हे नव्या पिढी बिंबविण्याचे काम आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. जुन्या जाणत्या क्रीडापटूंना बघून, भेटून व संवाद साधून त्यांच्या दायित्वाची कल्पना येते. या एका पिढीने प्रचंड कष्ट घेतल्यामुळे सुविधा नसणाऱ्या काळात नागपूरच्या नावलौकिकाला ते वाढवू शकले. त्यामुळे नव्या पिढीने जोमाने या क्षेत्रात पदार्पण आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी शिव छत्रपती पुरस्कार, राज्य व राष्ट्रीय युवा पुरस्कार प्राप्त तीस खेळाडूंचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.
शिव छत्रपती पुरस्कार विजेते विजय कविश्वर, अँथलेटीक्समध्ये दादोजी कोंडदेव पुरस्कार संजय काणे, सिताराम भोतमांगे दादोजी कोंडदेव (हँडबॉल), डॉ. सुनील भोतमांगे दादोजी कोंडदेव, शिवछत्रपती पुरस्कार (हँडबॉल), संदीप गवई एकलव्य पुरस्कार (दिव्यांग धनुर्विद्या), संजय लोखंडे शिवछत्रपती पुरस्कार (संघटक), यापुढील सर्व मान्यवर हे शिवछत्रपती पुरस्कार विजेते होत. त्यात अतुल दुरुगकर (हँडबॉल) पियुष आंबुलकर (सॉफ्ट बॉल,) निखिलेश तभाणे व पियुष आकरे (स्केटिंग), मोहम्मद कुरेशी, श्रीमती लक्ष्मी चौरे, वैशाली नागुलवार, नंदकुणाल धनविजय आणि दामिनी रंभाड (तलवारबाजी), शत्रुघ्न गोखले व सतिश वरिअर (बास्केटबॉल), राजकुमार नायडू, मिलींद माकडे, रुपकुमार नायडू, मृदुला केदार, आत्माराम पांडे, आशिष बँनर्जी, अनिता हलमारे-भोतमांगे, इंद्रजितसिंग रंधवा, भावना किंमतकर, प्रिती सुपारे, समिक्षा ईटनकर, अश्लेशा इंगोले (हँडबॉल) दिपक कविश्वर, प्रवीण वहाले, भूषण गोमासे, सौरभ मोहोड आणि डॉ. अशोक पाटील (आट्यापाट्या), शारदा नायडू, नितू नेवारे, नसीम शेख, भूषण बांते, कल्पना मिश्रा, आशा मेश्राम आणि लता यादव (फुटबॉल) अंजली देशपांडे, अरुणा आरवे आणि सुनील भडांगे (व्हॉलीबॉल), अपर्णा भोयर, माधुरी गुरनुले, स्वाती गुरनुले आणि वैशाली चतारे (अँथलेटीक्स), गजानन बुरडे, प्रदीप देशपांडे, सुशील झाम आणि दिनेश सार्वे (सायकलपोलो) असून, खालील पुरस्कारार्थी दिव्यांग उत्तम मिश्रा, प्रवीण उघडे, गिरीश नागभिडकर, संजय भोसकर आणि वैशाली थुल (अँथलेटीक्स) भारत्तोलनमध्ये प्रवीण सोरते, लतिका माने -लेकुरवाळे, रोशनी रिंके आणि प्रतिमा बोंडे या पुरस्कारार्थींचा समावेश आहे.