
स्थैर्य, मुंबई, दि. ०३ : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, लेखिका, प्रा. पुष्पा भावे यांचे रात्री साडे बारा वाजता मुंबईत निधन झाले.
स्वातंत्र्योत्तर काळात महागाईविरोधी आंदोलनामध्ये अहिल्याताई रांगणेकर आणि मृणाल गोरे यांच्यासमवेत पुष्पाताई या लाटणे मोर्चात हिरिरीने सहभागी झाल्या होत्या. मुंबईतील गिरणी कामगार संघर्ष समितीच्या चळवळीला वैचारिक मार्गदर्शन करण्यापासून कामगारांना हक्काचे घर मिळावे यासाठी सरकारशी संघर्ष करण्यात पुष्पाताई अग्रभागी होत्या. स्त्रीवादी चळवळीची पाठराखण करणाऱ्या पुष्पाताईंनी दलित स्त्रियांच्या संघटनेमध्ये स्वतंत्र वैचारिक भूमिका घेत संघटन केले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये त्या आरंभापासून होत्या.
डॉ. बाबा आढाव यांच्या असंघटित कामगार चळवळीत हमाल, रिक्षावाले, कागद-काच-पत्रा वेचणारे अशा कष्टकऱ्यांच्या आंदोलनांमध्ये त्या समर्थक राहिल्या. सामाजिक कृतज्ञता निधी या सामाजिक कार्यकर्त्यांना मानधन देणाऱ्या उपक्रमामध्ये पुष्पाताई सतत अग्रभागी असत. रमेश किणी खुन प्रकरण लावून धरण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. मुंबईत पर्यायी साहित्य संमेलन आयोजित करण्यात पुढाकार.