
स्थैर्य, तरडगाव, दि. ३१ डिसेंबर : स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेतील निवृत्त प्राध्यापक आणि तरडगाव (ता. फलटण) येथील सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व प्रा. रविंद्र राजाराम गायकवाड यांचे ३० डिसेंबर रोजी पहाटे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.
प्रा. रविंद्र गायकवाड हे तरडगावचे माजी सरपंच कै. राजाराम सिताराम गायकवाड (अण्णा) यांचे सुपुत्र होत. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या गायकवाड यांचे महाविद्यालयीन शिक्षण सातारा येथील छ. शिवाजी कॉलेज आणि कोल्हापूर येथील छ. शिवाजी विद्यापीठात झाले होते.
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेत प्राध्यापक म्हणून रुजू झाले. आपल्या कारकिर्दीत त्यांनी साताऱ्यातील लालबहादूर शास्त्री महाविद्यालय, जत येथील राजे रामराव महाविद्यालय आणि पाचगणी येथील मीनलबेन मेहता महाविद्यालय या ठिकाणी अध्यापनाचे काम केले. अध्यापनासोबतच त्यांनी प्राध्यापक संघटनेचे कामही पाहिले होते.
सेवानिवृत्तीनंतर त्यांनी तरडगाव येथे वास्तव्य केले होते. तेथील सामाजिक कार्यात त्यांचा मोठा सहभाग होता. श्री ज्ञानेश्वर माऊली विचार मंच, तरडगावचे ते संस्थापक अध्यक्ष होते. तरडगाव येथील हायस्कूलची इमारत उभारणी आणि इतर धार्मिक कार्यक्रमांत त्यांचे मोलाचे योगदान होते. गावातील नागरी प्रश्न सोडवण्यासाठी ते सदैव प्रयत्नशील असत. एक अभ्यासू आणि निर्भीड व्यक्तिमत्व म्हणून त्यांची परिसरात ख्याती होती. त्यांनी अनेक ठिकाणी सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक विषयांवर व्याख्याने दिली, तसेच धार्मिक क्षेत्रात प्रवचनेही केली.
त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन विवाहित मुली, सुना, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.

