दैनिक स्थैर्य | दि. ३० ऑक्टोबर २०२१ | मुंबई | ज्येष्ठ साहित्यिक शरणकुमार लिंबाळे यांच्या ‘सनातन’ या कादंबरीला प्रतिष्ठेचा सरस्वती सन्मान प्राप्त झाल्याबद्दल राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे श्री. लिंबाळे यांचा सत्कार करण्यात आला.
सत्कार सोहळा तसेच सनातन पुस्तकावर साहित्यिकांच्या परिसंवादाचे आयोजन अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या महाराष्ट्र शाखेच्या वतीने करण्यात आले होते.
राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले, समाजात, विशेषतः ग्रामीण भागात साहित्याच्या माध्यमातून समाजातील कुप्रथा, सामाजिक कटुता, वैमनस्य संपावे यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. भारतीय हाच प्रत्येक नागरिकाचा परिचय असावा. धर्म म्हणजे योग्य आचरण. भारताला स्वातंत्र्य प्राप्त होऊन 75 वर्षे होत आहेत. देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी सर्वंकष प्रयत्न होत आहेत, असेही श्री. कोश्यारी यांनी सांगितले.
‘सनातन’चे भाषांतर अनेक भारतीय भाषांमध्ये व्हावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
श्री. शरणकुमार लिंबाळे यांनी सत्काराला उत्तर दिले.
कार्यक्रमाला अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय महामंत्री श्रीधर पराडकर, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नरेंद्र पाठक, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर, एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरू उज्वला चक्रदेव, अभिराम भडकमकर, डॉ पृथ्वीराज तौर, मंजुषा कुलकर्णी, रवींद्र गोळे, बळीराम गायकवाड, डॉ अरुण ठोके आदी उपस्थित होते.