दैनिक स्थैर्य । दि. १४ मे २०२३ । मुंबई । महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर आता महाविकास आघाडी तसेच भाजप आणि शिंदे गटाकडून प्रतिक्रिया येत आहेत. यानंतर आता महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केल्या जात असलेल्या टीकेला भाजप-शिंदे गटाकडून प्रत्युत्तर दिले जात असून, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. यातच राष्ट्र्वादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलेल्या टीकेला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले.
सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणाले होते की, सर्वोच्च न्यायालयाने राज्यकर्त्यांबाबत तीव्र भूमिका मांडली आहे. काही निर्णय अद्याप येणे बाकी आहे. राज्यपालांची भूमिका चुकीची राहिली होती याचे उत्तम उदाहरण महाराष्ट्राने पाहिले आहे. भाजप आणि नैतिकता यांचा काही संबंध आहे असे मला वाटत नाही, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर देवेंद्र फडणवीस यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली.
ज्येष्ठ नेते आहेत, बोलत असतात, इतके लक्ष द्यायचे नसते
शरद पवारांचा नैतिकतेशी काही संबंध आहे का? आता जर शरद पवारांनी भाजपाला नैतिकता शिकवायची ठरवली तर कठीणच होईल. मग इतिहासात जावे लागेल. वसंतदादांचे सरकार कसे गेले इथून सुरुवात होईल. त्यामुळे जाऊ द्या. ज्येष्ठ नेते आहेत. बोलत असतात. इतके लक्ष द्यायचे नसते, या शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले.
दरम्यान, अध्यक्षांनी १५ दिवसांत निर्णय घ्यावा, अशी मागणी ठाकरे गटाने केली आहे. यावर बोलताना, सर्वोच्च न्यायालयाने अतिशय स्पष्टपणे या संदर्भातील सगळे अधिकार अध्यक्षांना दिले आहेत. त्यामुळे अशा प्रकारे अध्यक्षांवर दबाव आणण्याचा प्रयत्न कुणी करत असेल, तर ते मुक्त आणि न्याय्य अशा प्रकारच्या न्यायप्रक्रियेत बसत नाही. मला वाटत नाही की, अध्यक्ष कोणत्या दबावाला बळी पडतील. विधानसभा अध्यक्ष स्वत: निष्णात वकील आहेत. त्यामुळे ते कायद्यानुसार निर्णय घेतील. योग्य सुनावणी करून योग्य निर्णय ते घेतील, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.