
दैनिक स्थैर्य | दि. ०५ फेब्रुवारी २०२३ | फलटण | शेतकर्यांच्या शेतीला पाणी मिळावे म्हणून स्व.माजी खासदार हिंदुरावजी नाईक निंबाळकर, माजी आमदार स्व.चिमणराव कदम, ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे व ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील यांनी हक्काचे पाणी मिळावे म्हणून अहोरात्र प्रयत्न केले. तसेच सुरूवातीच्या काळामध्ये फलटणला रेल्वे आणण्यासाठी व फलटणचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी लोकनेते स्व. हिंदुराव नाईक निंबाळकर यांच्यासमवेत जेष्ठ नेते सुभाष शिंदे यांचा मोलाचा वाटा आहे, असे गौरवोद्गार माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी काढले.
फलटण येथील ज्येष्ठ नेते सुभाष शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी त्यांचा यथोचित सत्कार केला. त्यानिमित्ताने खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे-पाटील उपस्थित होते.
यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले की, शेतकर्यांना पाणी मिळण्यासाठी नीरा-देवघर प्रकल्पाच्या कामांना गती मिळण्यासाठी स्व.माजी खासदार हिंदुरावजी नाईक निंबाळकर यांच्यासोबत माजी आमदार स्व.चिमणराव कदम, ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे व ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील झटत होते. मात्र, त्याउलट नीरा-देवघर प्रकल्पाच्या कामाला निधी अथवा परवानग्या मिळू नयेत व तो प्रकल्प पूर्ण होऊ नये म्हणजे ते पाणी बारामतीला मिळून आपले मंत्रिपद व खुर्ची टिकली पाहिजे यासाठी दुष्काळी भागातील शेतकर्यांना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न केला गेला, असा आरोपही खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केला.
पुढे बोलताना खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले की, फलटण तालुक्यामध्ये रेल्वे आणण्यासाठी माजी खासदार स्व. हिंदुराव नाईक निंबाळकर यांच्यासोबत जेष्ठ नेते सुभाष शिंदे यांनीसुद्धा मोठा संघर्ष उभा केला होता. फलटणला रेल्वे आणण्यात जेष्ठ नेते सुभाष शिंदे यांचे मोठे योगदान आहे. जेष्ठ नेते सुभाष शिंदे यांनी केलेला संघर्ष कोणीही विसरून चालणार नाही,
नीरा-देवघर प्रकल्पाला राज्य सरकारच्या माध्यमातून सुधारित मान्यता मिळत तब्बल ३९७६ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आम्ही केलेल्या कामांना मूर्त स्वरूप देत शिखर गाठले, असे गौरवोद्गार जेष्ठ नेते सुभाषराव शिंदे यांनी काढले.
नीरा-देवघर प्रकल्पाच्या कामांना मंजुरी मिळवून त्यास खर्या अर्थाने गती देण्याचे कार्य माजी खासदार स्व.हिंदुरावजी नाईक निंबाळकर व जेष्ठ नेते सुभाषराव शिंदे व जेष्ठ नेते स्व.बाळासाहेब बागवान यांनी करून खर्या अर्थाने प्रचंड संघर्ष केला. त्यामुळे त्याची उतराई व्हावी व त्यासाठी त्यांची दखल घेणे गरजेचे असल्याचे स्पष्ट करीत ‘जिद्द’ या बंगल्यावर जात खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे यांचा फेटा, शाल व श्रीफळ देत सत्कार केला. यावेळी जेष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील, माजी नगरसेवक अशोकराव जाधव, युवा नेते विराज खराडे, मनसेचे युवा नेते युवराज शिंदे, माजी नगरसेवक सचिन अहिवळे, युवा नेते अमित रणवरे व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
नीरा-देवघर प्रकल्पाच्या उर्वरित कामांसाठी सुधारित प्रशासकीय मान्यता तसेच ‘ना भूतो, ना भविष्यती’ असा ३९७६.८३ कोटी रुपयांचा निधी उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे खर्या अर्थाने खंडाळा, फलटण व माळशिरस परिसरातील शेतकरी समृद्ध होणार आहे.
दरम्यान, ज्येष्ठ नेते सुभाष शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सुप्रीमो खासदार शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू नेते म्हणून ओळखले जातात. खासदार शरद पवार व ज्येष्ठ नेते सुभाष शिंदे यांचे संबंध संपूर्ण फलटण तालुक्याला नव्हे तर सातारा जिल्ह्याला ज्ञात आहेत. त्यातच आज भाजपाचे माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सुभाष शिंदे यांचा त्यांच्या निवासस्थानी जावून जो यथोचित सत्कार केला. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.