
स्थैर्य, पुणे, दि. 9 डिसेंबर : कामगार, हमाल, माथाडी व कष्टकरी वर्गाच्या न्याय्य हक्कांसाठी सातत्याने आवाज उठवणारा बुलंद आवाज, असंघटित कष्टकर्यांचे ज्येष्ठ नेते डॉ. बाबा आढाव (वय 96) यांचे निधन झाले.
बाबा आढाव पत्नी शीला यांच्यासह पुण्यात बिबवेवाडी परिसरात वास्तव्यास होते. असीम हा अमेरिकेत बोस्टन येथे तर अंबर हा कॅनडातील टोरँटो येथे वास्तव्यास आहे. बाबांची तब्येत बिघडल्याने काही दिवसांपूर्वीच ते पुण्यात परतले होते.
हमाल पंचायतीचे संस्थापक डॉ. बाबा आढाव यांना फुप्फुसामध्ये जंतू संसर्ग झाल्याने उपचारासाठी ह्रदयविकारतज्ज्ञ व फिजिशियन डॉ. अभिजित वैद्य यांच्या निगराणीखाली पूना हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात काही दिवसांपूर्वी दाखल केले होते. त्यांचे वयही जास्त असल्याने आजाराची तीव्रता बळावत गेली. प्रकृती ही उपचारांना साथ देत नसल्याने तब्येत गंभीर झाली.
डॉक्टरांच्या पथकाने शर्थीचे प्रयत्न केले. मात्र सोमवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली, अशी माहिती त्यांच्यावर उपचार करणारे डॉ. अभिजित वैद्य यांनी दिली. डॉ. वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली जनरल फिजिशियन डॉ. अजित तांबोळकर, रक्तविकारतज्ज्ञ डॉ. विजय रमणन, डॉ. निरंजन आंबेकर, डॉ. जयदीप दाते आणि डॉ. नितीन अभ्यंकर हे तज्ज्ञांचे पथक त्यांच्या तब्येतीवर लक्ष ठेवून होते.
अंत्यसंस्कार उद्या संध्याकाळी
बाबा आढावांचे पार्थिव उद्या (मंगळवारी) सकाळी 10 वाजता हमाल भवन मार्केटयार्ड येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. अंत्यसंस्कार सायंकाळी साडे पाच वाजता वैकुंठ स्मशान भूमीत केले जाणार आहे.
आपले विचार व कृती यात तडजोड न करणारे
मनुवादी, ब्राम्हो- भांडवली शोषकांच्या गढीला आणि त्यांच्या अमानुष तत्वज्ञानाला आपल्या न्याय, निडर, आणि संविधानीक भुमिकेने डॉ. बाबा आढाव यांनी अक्षरशः सुरुंग लावले . आपले विचार व कृती या मध्ये बाबा आढाव यांनी कधीही तडजोड केली नाही. जाती अंताची ठाम भूमिका घेऊन कार्यरत असलेले बाबा आढाव यांच्यासारखे विचारवंत सत्यशोधक एकमेवाद्वितीयच. त्यांच्या निधनाने महिला, कष्टकरी वर्ग, दलित ,आदिवासी, हमाल या वर्गाचा तारणहार गेला आहे. विषमता निर्मूलन शिबिरे पुन्हा एकदा सुरू करणे आणि विद्रोही सांस्कृतिक चळवळीची एकजूट करणे हीच खरी बाबा आढाव यांना श्रद्धांजली ठरेल.
विजय मांडके, राज्य प्रवक्ता, विद्रोही सांस्कृतिक चळवळ, महाराष्ट्र

