स्थैर्य, फलटण : सातारा जिल्ह्याच्या राजकारण व समाजकारणातील ज्येष्ठ नेते, जिल्हा मध्यवर्ती सहकारी ग्राहक संघाचे विद्यमान संचालक जयसिंगराव गोडसे उर्फ तात्या यांचे वयाच्या ९० वर्षी वृद्धापकाळाने आज राहत्या घरी डिस्कळ, ता. खटाव येथे निधन झाले. वडूज, ता. खटाव येथून डिस्कळ येथे वतनावर आलेले जयसिंगराव गोडसे यादवराव घरण्याचा ऐतिहासिक वारसा आहे, त्यांचे वडील मारुतराव हे जमादार होते.
सातारा जिल्ह्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेते म्हणून ते खटाव तालुक्याच्या किंबहुना जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय होते, माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण व माजी आमदार केशवराव पाटील यांचे ते खंदे समर्थक होते, तसेच माजी आमदार स्व. भाऊसाहेब गुदगे, स्व. सदाशिवराव पोळ यांचे स्नेही होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग होता, खटाव तालुका मार्केट कमिटीचे सभापती, सदस्य होते. सध्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी ग्राहक संघाचे उपाध्यक्ष होते. शेतकरी संघटना नेते शंकरराव गोडसे यांचे ते चुलते होते. डिस्कळ गावच्या विकासात तात्यांचा मोठा वाटा आहे, गावामधे काही सदस्या सोबत त्यांनी शिवाजी शिक्षण संस्था काढून हायस्कूल सुरु केले आहे.