
दैनिक स्थैर्य । 5 मार्च 2025। फलटण । आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनेअंतर्गत राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांना मासिक 20 हजार अर्थसहाय्य मिळण्याचा मार्ग सुलभ झाला आहे. याबद्दल राज्यातील पत्रकारांच्यावतीने महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, एकनाथ शिंदे यांना धन्यवाद दिले आहेत.
रविंद्र बेडकिहाळ प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, “राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांना आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनेअंतर्गत दिले जाणार्या रुपये 11 हजाराच्या अर्थसहाय्यात वाढ करुन ते रुपये 20 हजार करण्याचा शासन निर्णय गेल्या 14 मार्च 2024 रोजी झाला होता. मात्र हे अधिकचे अर्थसहाय्य ज्येष्ठ पत्रकारांना अद्याप दिले जात नव्हते. याबाबत महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीने वारंवार शासनाचे लक्ष वेधले होते. ही योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी शासनाने पत्रकारांच्या कल्याणार्थ स्थापन केलेल्या शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधीच्या स्थायी निधीमध्ये वाढ होणे आवश्यक असल्याचेही शासनास निदर्शनास आणून दिले होते.
या मागणीनुसार आता शासनाने शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधीच्या ठेव रक्कमेत 50 कोटींची वाढ करुन या निधीची एकूण ठेव रक्कम आता 100 कोटी केली आहे. या मुदत ठेव स्वरुपात गुंतवण्यात आलेल्या निधीच्या व्याजातून आता ज्येष्ठ पत्रकारांना मासिक 20 हजार आर्थिक सहाय्य मिळण्याचा मार्ग सुलभ झाला आहे. या दोन्ही निर्णयाबाबतचे स्वतंत्र शासन निर्णय काल शासनाकडून निर्गमीत करण्यात आले आहेत”, असेही बेडकिहाळ यांनी नमूद केले.
दरम्यान, या ज्येष्ठ पत्रकार सन्माननिधीतील ही रु. 9 हजार ची वाढ देताना ती याबाबतचा शासन निर्णय झाल्यापासून म्हणजेच दि. 14 मार्च 2024 पासूनच्या फरकासह येत्या दि. 01 एप्रिल पासून देण्यात यावी, अशी मागणीही यापूर्वीच केली आहे. या मागणीचा शासनाने सकारात्मक विचार करावा”, असेही आवाहन रविंद्र बेडकिहाळ यांनी केले आहे.