
स्थैर्य, फलटण, दि. ३० ऑगस्ट : फलटण तालुक्याच्या पत्रकारितेत आपल्या धारधार लेखणीने आणि सामाजिक बांधिलकीने स्वतंत्र ओळख निर्माण करणारे, प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे राज्य समन्वयक तथा ज्येष्ठ पत्रकार श्री. सचिन संपतराव मोरे यांचा आज, ३० ऑगस्ट रोजी वाढदिवस. गेल्या दोन दशकांहून अधिक काळ पत्रकारिता, प्रभावी वक्तृत्व आणि व्यावसायिक प्रशिक्षण यांसारख्या विविध क्षेत्रांत त्यांनी दिलेल्या योगदानाला यानिमित्ताने उजाळा मिळत आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या “तलवारीच्या धारेपेक्षा लेखणीची धार कायम टिकणार आहे,” या विचाराने प्रेरित होऊन श्री. मोरे यांनी पत्रकारितेत आपली वाटचाल सुरू केली. गेल्या २२ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी साप्ताहिकच्या माध्यमातून अनेक नवोदितांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले. तालुक्यातील शंभरहून अधिक गावांमध्ये पोहोचून तेथील सामाजिक, व्यावसायिक आणि विकासात्मक प्रश्नांना त्यांनी आपल्या लेखणीतून वाचा फोडली. अन्यायावर परखड प्रहार करतानाच, चांगल्या कामाचे कौतुक करण्याची त्यांची संतुलित शैली सर्वपरिचित आहे.
पत्रकारितेसोबतच, श्री. सचिन मोरे हे एक प्रभावी वक्ते आणि विक्री व विपणन क्षेत्रातील यशस्वी प्रशिक्षक म्हणूनही ओळखले जातात. त्यांनी आपल्या ‘धैर्य फाऊंडेशन’च्या माध्यमातून महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, गोवा, दिल्ली अशा अनेक राज्यांमध्ये परिसंवाद घेऊन हजारो व्यावसायिकांना आणि नवोदित वक्त्यांना मार्गदर्शन केले आहे. “एक निर्धार बौद्ध आमदार” या सामाजिक जागृती मोहिमेतील त्यांची भाषणे समाज माध्यमांवर विशेष गाजली होती.
शून्यातून विश्व निर्माण करण्याची क्षमता प्रत्येकात असते, फक्त ती ओळखता आली पाहिजे, असा संदेश ते तरुणांना नेहमी देतात. त्यांच्या या बहुआयामी व्यक्तिमत्त्वास वाढदिवसानिमित्त विविध स्तरांतून शुभेच्छा दिल्या जात आहेत.