महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक सहकारी संघाचे अध्यक्ष म्हणून लघु वृत्तपत्र संपादकांच्या अडचणीत सातत्याने भक्कम पाठीराखे म्हणून उभे राहणारे फलटण (जि.सातारा) येथील ज्येष्ठ पत्रकार श्री.रविंद्र बेडकिहाळ यांना आज ‘यशवंतराव चव्हाण सामाजिक कृतज्ञता पुरस्कार’ देवून सन्मानित करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने….
पत्रकारांसमोर पत्रकारितेतील आव्हानांबरोबरच स्वत:चे संरक्षण, आपद्प्रसंगी आर्थिक मदत, पेन्शन, अधिस्वीकृती, पत्रकार भवन, पत्रकार वसाहत, वृत्तपत्रांची शासन मान्यता, जाहिरात दरवाढ असे एक ना अनेक प्रश्न उभे असतात. हे प्रश्न सोडवायचे असतील तर पत्रकारांनी आपापसातील मतभेद बाजूला ठेवून एकत्रित येणे गरजेचे असते. पत्रकार संघटना वेगवेगळ्या असल्या तरी सर्वांचे प्रश्न एकच आहेत. त्यामुळे सर्व प्रश्न सुटेपर्यंत सर्वांनी एकत्र हा लढा सुरु ठेवणे हिताचे असते. नेमक्या याच भूमिकेतून राज्यातील पत्रकारांसमोर व विशेषत: छोट्या वृत्तपत्रांच्या संपादकांसमोर कोणतेही संकट आले तरी त्यांचे ‘संकट मोचक’ म्हणून श्री.रविंद्र बेडकिहाळ सर्वप्रथम धावून येतात. पत्रकारांना नेहमीच सहाय्य करण्याची भूमिका पार पाडून विधायक कार्यात ते आघाडीवर असतात. हे त्यांच्या सलग 50 हून अधिक वर्षाच्या पत्रकारितेतील सर्वात मोठे वैशिष्ठ्य आहे.
राज्यातील लघु व मध्यम वृत्तपत्रांच्या संपादकांसाठी सन 1981 साली स्थापन झालेल्या व महाराष्ट्रात सहकारी तत्वावर कार्यक्षमरित्या सुरु असलेल्या वृत्तपत्र संपादकांच्या एकमेव अशा महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक सहकारी संघ या संस्थेचे श्री.बेडकिहाळ सर अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. सुमारे 43 वर्षांचा इतिहास असणार्या या संस्थेमार्फत जिल्हा वृत्तपत्र व संपादकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न या संस्थेच्या माध्यमातून श्री.बेडकिहाळ सर करीत आहेत. यामध्ये शासकीय अधिस्वीकृतीधारक पत्रकार व त्यांचे कुटूंबिय यांना शासनाच्या महात्मा फुले आरोग्य योजनेच्यामाध्यमातून वैद्यकीय सुविधा मिळवून देणे, महाराष्ट्र शासनाच्या जाहिरात धोरणात बदल घडवून आणून शासनमान्य वृत्तपत्रांच्या जाहिरातदरामध्ये वाढ करणे, शासनमान्य यादीवरील वृत्तपत्रांच्या होणार्या पडताळणीमधील वृत्तपत्रांना
मारक असलेल्या वृत्तपत्रांचा आकार, खपाची संख्या, पृष्ठ संख्या, वर्षातील एकूण अंकांची संख्या, जाहिरात वितरण, वर्गीकृत जाहिरातींची संख्या, पडताळीसाठीची कागदपत्रे याबाबतच्या अटी रद्द होण्यासाठी श्री.रविंद्र बेडकिहाळ सर याही वयात राज्यातील तमाम वृत्तपत्र संपादक व मालकांचे नेतृत्त्व करीत आहेत.
शासनाच्या जाहिरात पुनर्विलोकन समिती सदस्य पदाच्या कार्यकाळात सरांनी छोट्या वृत्तपत्रांना शासनाकडून देण्यात येणार्या दर्शनी जाहिरातींच्या संख्येत वाढ करुन घेत या वृत्तपत्रांना आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यासाठी योगदान दिले आहे. इतकेच नाही तर जाहिरात दरवाढ होण्यासाठीही सरांनी मंत्रालय स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला आहे. शासनाकडून मोठ्या वृत्तपत्रांच्या तुलनेत लघु वृत्तपत्रांना जाहिरात वितरणात अन्यायकारक वागणूक दिली जाते. याविरोधातही सरांनी शासनदरबारी वारंवार आवाज उठवून छोट्या वृत्तपत्रांवरील हा अन्याय दूर होण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत.
ज्येष्ठ निवृत्त संपादक व पत्रकारांना शासनाकडून मिळणारा आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान निधी सुरु करण्यामागेही श्री.रविंद्र बेडकिहाळ यांचा महत्त्वाचा पाठपुरावा होता. शिवाय दरमहा रु.11 हजार मिळणार्या या सन्मान निधीमध्ये रु.9 हजाराची वाढ वाढ होण्यामागेही सरांचे यशस्वी प्रयत्न आहेत.
एकूणच सरांचे हे कार्य तमाम वृत्तपत्र संपादकांना अभिमानास्पद आणि मार्गदर्शक असेच आहे.
-
प्रसन्न रुद्रभटे,
फलटण.