स्थैर्य, सातारा, दि. 17 : ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे (जन्म: इ.स. १९२५) यांचे आज सकाळी वृध्दापकाळाने निधन झाले. पत्रकारितेतील लोकशाही मूल्ये, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, दलित, आदिवासी व श्रमिकांच्या प्रश्नांसाठी त्यांनी नेहमी आवाज उठवला आहे.
दिनू रणदिवे यांचा जन्म डहाणूतील आदिवासीबहुल भागात १९२५ मध्ये झाला. त्यांनी १९५६ साली पत्रकारितेला सुरूवात केली. रणदिवे यांनी पत्रकारितेत महत्त्वाचे योगदान दिले आहे. ते १९५५ मध्ये समाजवादी पक्षाने छेडलेल्या गोवा मुक्ती संग्रामातही सक्रिय होते. नंतर संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही त्यांचा सक्रिय सहभाग राहिला तसेच या लढ्यात त्यांनी डांगे, आचार्य अत्रे यांच्या बरोबर कारावासही भोगला. संयुक्त महाराष्ट्र समितीने १९५६ साली संयुक्त महाराष्ट्र पत्रिका नावाचे अनियतकालिक सुरू केले. रणदिवे यांच्या पत्रकारितेची सुरुवात येथूनच झाली होती. नंतर ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये रणदिवे रूजू झाले व महाराष्ट्र टाइम्सचे मुख्य वार्ताहर म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम केले. १५ सप्टेंबर १९८५ रोजी ते मटातून निवृत्त झाले, तोपर्यंत त्यांनी वार्तांकनात महत्त्वाचे मापदंड घालून दिले. १९७२ मध्ये रणदिवेंनी केलेले बांग्लादेश मुक्तिलढ्याचे वार्तांकनही गाजले होते. त्यांनी संयुक्त महाराष्ट्र पत्रिका व लोकमित्र या नियतकालिकाचे संपादन त्यांनी केले आहे. ते सेबिस्टियन डिसोझा मुंबई मिररमध्ये फोटो एडिटर होते. मुंबईवरील २६/११च्या हल्ल्यावेळी त्यांनी धाडसाने छायाचित्रण करून पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाबला आपल्या कॅमेऱ्यात कैद केले होते, जो या प्रकरणात एक महत्त्वाचा पुरावा ठरला. त्यापूर्वी त्यांनी फ्रेंच वृत्तसंस्था एएफपीसाठीही काम केले होते. २००२ मधील गुजरात दंगलीचे वास्तवसुद्धा त्यांनी माध्यमांमध्ये आणले होते.
‘सिंहासन’ मधील खांद्याला शबनम, डोळ्यावर काळा चष्मा आणि त्याच्यातली शोधक नजर असलेला ‘दिगू टिपणीस’ अंतर्धान पावला आहे. दिनू रणदिवे यांचे निधन झाले आहे. खरे तर कोणीही सामाजिक कार्यकर्ता, कामगार नेता गेला की त्याची बातमी रणदिवे देत. त्यासाठी अपार कष्ट घेत. गरिबांवरील अन्यायामुळे ते चवताळून उठत. जमीनदारांकडून होणारे शेतकऱ्यांचे, वेठबिगारांचे वा भांडवलदारांकडून कामगारांचे होणारे शोषण रणदिवे यांना सहन होत नसे. जॉर्ज, एसेम, डांगे ही त्यांची दैवते होती. बांगलादेश मुक्तिसंग्रामाचे त्यांनी केलेले वर्णन, रिपोर्टिंग वेगळे होते. केवळ मर्दुमकीची वर्णने आणि मृतांची आकडेवारी देणे, हे त्यांनी केले नाही. त्यांनी युद्धात सामान्य माणसाची होणारी वाताहत टिपली. दत्ता सामंत यांचा गिरणी संप सुरू असताना, गिरणी मालकांचे मीडियावरही दबावतंत्र सुरू होते. अशावेळी रणदिवे यांनी गिरणी कामगारांची बाजू लावून धरली. मुंबई विद्यापीठातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणला. वसंतदादा पाटील यांच्या काळात धारावीत झालेला भूखंड घोटाळा समोर आणला. शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, दलित, मागासवर्गीय आणि सर्वसामान्य गोरगरीब लोक यांच्या दुःखांना सतत वाचा फोडली. गोवा मुक्ती आंदोलन, संयुक्त महाराष्ट्र चळवळ यात भाग घेतला. कारावास सोसला. पण आयुष्यात आर्थिक सुख काही या माणसाच्या वाट्याला आले नाही. नोकरीत आपल्या कामाची बूज राखली गेली नाही. याची त्यांच्या मनात रास्तपणे खंत होती. समाज व पत्रकारितेसाठी दिनू रणदिवेंनी आयुष्य दिले. पण या माणसाची समाजाने मात्र उपेक्षाच केली. सरकारला त्यांना साधे घर द्यावे असेही वाटले नाही. जुन्या घरात उतारवयात जिने चढणे, उतरणे त्यांना शक्य होत नव्हते. काही दिवसांपूर्वी रणदिवे यांच्या पत्नीचे निधन झाले. पूर्वी रणदिवेंचा फोन येत असे. ते विचारपूस करत असत. सर्व वर्तमानपत्रे वाचत असत. नोकरीत असताना कित्येक वर्षे रात्री काम झाले की ‘हिंदू’ वगैरे वर्तमानपत्रांची कात्रणे ते कापून ठेवत असत आणि बारा, एकनंतर घरी पोहोचत असत. त्यांच्याकडून चळवळींबद्दलचे बरेच लेखन होऊ शकले असते. परंतु बड्या प्रकाशकांनी त्याबाबत उत्साह दाखवला की नाही, याची कल्पना नाही. पत्रकारितेचे स्वरूप आता इतके बदलले आहे की ‘दिगू टिपणीस’ म्हणजेच दिनू रणदिवे हा परग्रहावरचा माणूस वाटायला लागला आहे… फौंटन पेनने लिहिलेली रणदिवे यांची कॉपी आजही आठवते… दोन परिच्छेदांची बातमी असली, तरी त्यात रणदिवे यांच्या सामाजिक दृष्टीची पाऊले उमटायची. आता दिनू रणदिवे नावाचा हळू आवाजात, कमी बोलणारा, पण सामाजिक अन्यायामुळे आतून कमालीचा अस्वस्थ असणारा पत्रकार दूर निघून गेला आहे.. रणदिवेंवरील अन्यायाला वाचा फोडणारा कोणीच नाही आणि आता त्याचा काही उपयोगही नाही! दिनू रणदिवे यांना आदरांजली.
हेमंत देसाई