ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता आणि सौ. इंदुमती मेहता यांचा अमृत महोत्सवी नागरी सत्कार सोहळा आज

महाराजा मंगल कार्यालयात मान्यवरांची मांदियाळी जमणार; श्रीमंत रामराजे आणि रणजितसिंह एकाच व्यासपीठावर येणार


स्थैर्य, फलटण, दि. ३ सप्टेंबर : फलटणच्या पत्रकारिता क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व, श्री. अरविंद मेहता आणि त्यांच्या पत्नी सौ. इंदुमती मेहता यांच्या अमृत महोत्सवानिमित्त, आज बुधवार, दि. ३ सप्टेंबर रोजी सकाळी १०:३० वाजता महाराजा मंगल कार्यालयात भव्य नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यासाठी तालुक्यातील आणि जिल्ह्यातील विविध राजकीय, सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर भूषविणार असून, माजी खासदार श्री. रणजितसिंह नाईक निंबाळकर हे स्वागताध्यक्ष आहेत. फलटणच्या राजकारणातील दोन प्रमुख नेते एकाच व्यासपीठावर येणार असल्याने या सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. ज्येष्ठ पत्रकार श्री. वसंत भोसले आणि ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांच्या हस्ते मेहता दांपत्याचा सत्कार होणार आहे.

या सोहळ्यासाठी आमदार श्री. सचिन पाटील, माजी आमदार श्री. दिपकराव चव्हाण, ज्येष्ठ नेते श्री. प्रल्हादराव साळुंखे पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, जिल्हा बँकेचे संचालक श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर, यांच्यासह विविध संस्थांचे आणि राजकीय पक्षांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमात सातारा जिल्ह्यातील अन्य ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान आणि स्मरणिकेचे प्रकाशनही होणार आहे. कोणत्याही प्रकारची भेटवस्तू न आणता, केवळ उपस्थित राहून मेहता दांपत्याचा सन्मान करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. कार्यक्रमानंतर स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!