ज्येष्ठ काँग्रेस नेते शरद रणपिसे यांचं वयाच्या ७२ व्या वर्षी पुण्यात निधन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २३ सप्टेंबर २०२१ । पुणे । ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि विधान परिषदेचे गटनेते शरद रणपिसे यांच आज गुरूवारी निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील रूग्णालयात उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

रणपिसे यांच्या हर्नियाच्या ऑपरेशन करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांच्यावर बायपास सर्जरी करण्यात आली होती. गेली पाच दिवस त्यांच्यावर व्हेंटिलेटरवर उपचार सुरु होते. मात्र आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला असल्याची माहिती काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार मोहन जोशी यांनी दिली.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व विधानपरिषदेचे गटनेते आ. शरद रणपिसे यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाची मोठी हानी झाली असून एक अभ्यासू व्यक्तीमत्व हरपले आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. शरदराव रणपिसे यांच्या जाण्याने काँग्रेस पक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या जाण्याने कधीही न भरुन निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या निधनाने मार्गदर्शक नेतृत्व गमाविल्याची भावना काँग्रेस पक्षातून व्यक्त होत आहे.

शरद रणपिसे यांच्याबद्दल.

१८ सप्टेंबर १९५१ रोजी पुण्यात शरद रणपिसेंचा जन्म झाला होता. पुण्यातच त्यांचं बालपण, महाविद्यालयीन शिक्षण झाले. महाविद्यालयात असताना त्यांना राजकारण आवडू लागले. काही काळातच त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि पुणे महानगरपालिकेचे सदस्य म्हणून त्यांनी आपल्या राजकीय जीवनाची कारकीर्द सुरू केली. विविध विषयांवर काँग्रेसची बाजू ते मांडायचे. विधिमंडळातील ज्येष्ठ नेत्यांमध्ये त्यांची गणना व्हायची. महानगरपालिकेपासून सुरु झालेला त्यांचा राजकीय प्रवास विधान परिषद आमदार ते विधिमंडळातील काँग्रेसचे महत्त्वाचे नेते आणि विधान परिषदेचे काँग्रेसचे गटनेतेपर्यंत येऊन पोहोचला होता.


Back to top button
Don`t copy text!