
दैनिक स्थैर्य । 25 मे 2025। सातारा। विजेच्या खांबावरील तुटलेल्या इलेक्ट्रिक तारेचा धक्का लागून एका ज्येष्ठाचा मृत्यू झाल्याची घटना काल सायंकाळी पावणेसातच्या सुमारास उघडकीस आली. बिरोबा वस्ती मळा येथे उसाच्या शेतात घडलेल्या या अपघातात संभाजी बाबूराव सूर्यवंशी (वय 77) यांचा मृत्यू झाला. मनोहर जर्नादन सूर्यवंशी यांनी याबाबतची माहिती पोलिसांत दिली.
पोलिसांच्या माहितीनुसार, संभाजी सूर्यवंशी घराजवळील उसाच्या शेतात जनावरांना वैरण चारा आणण्यासाठी गेले होते. सायंकाळी परत न आल्याने त्यांची मुलगी त्यांना पाहण्यासाठी गेली.त्यावेळी सूर्यवंशी यांना वीज वितरण कंपनीच्या खांबावरील तुटलेल्या इलेक्ट्रिक तारेचा धक्का लागून ते पडल्याचे दिसून आले. त्यांना खासगी वाहनातून उपचारासाठी येथील शासकीय रुग्णालयात आणले. त्यावेळी तेथील डॉक्टरांनी उपचारापूर्वीच ते मृत झाल्याचे घोषित केले. पोलिस तपास करत आहेत.