दैनिक स्थैर्य । दि. १८ ऑगस्ट २०२२ । मुंबई । आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ कार्यकर्ते, बौद्धजन पंचायत समितीचे उप कार्याध्यक्ष, बौद्धजन सहकारी पतसंस्थेचे सरचिटणीस, बौद्ध समाज सेवा संघ मंडणगड या संस्थेचे संस्थापक सदस्य, सभापती, तसेच मौजे वाकवली ता. मंडणगड, जिल्हा रत्नागिरी या गावचे सुपुत्र चंद्रकांत दगडू जाधव उर्फ सी.डी. जाधव साहेब यांचे नुकतेच के.ई.एम. हॉस्पिटलमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले.
झुंजार कर्तृत्व व आदर्श व्यक्तिमत्व असलेले सी.डी. जाधव हे चळवळीतील कणखर, आदर्श व वैचारिक वारसा असलेले व्यक्तिमत्व, ते प्रेमळ, मनमिळावू व सर्वसमावेशक स्वभावाचे म्हणून प्रसिद्ध होते.
दिवंगत सी.डी. जाधव यांची अंत्ययात्रा १४ ऑगस्ट रोजी निघाली त्यांच्या अंतयात्रेस बौद्धजन पंचायत समितीचे कार्याध्यक्ष आदरणीय लक्ष्मणजी भगत, माजी कार्याध्यक्ष किशोरजी मोरे, जनसंपर्क आणि प्रसिद्धी समितीचे कामगार नेते रमेश जाधव, संस्कार समितीचे मंगेश पवार, अतिरिक्त सचिव रवींद्र पवार, विलास शिंदे, भगवान तांबे, साहित्य-क्रीडा-कला समितीचे अध्यक्ष राजाभाऊ गमरे, भगवान साळवी आणि बौद्धजन पंचायत समितीच्या विविध समितींचे अध्यक्ष, चिटणीस तसेच व्यवस्थापक मंडळाचे सदस्य, सर्व उपसमित्या, सर्व शाखा यांचे पदाधिकारी, सदस्य, सभासद, मध्यवर्ती महिला मंडळ, बौद्धजन सहकारी पतसंस्थेच्या पदाधिकारी, बौद्ध समाज सेवा संघ मंडणगड या संघाचे गाव व मुंबई समितीचे कार्यकर्ते तसेच सामाजिक, राजकीय व समाजातील सर्व स्तरातील व्यक्ती उपस्थित होत्या.
सी.डी. जाधव सारखे एक आदर्श व्यक्तिमत्व आपल्यातून निघून गेल्याने सर्वजण हळहळ व्यक्त करत होते, आदर्श व्यक्तिमत्त्व हरपल्याने समाजामध्ये एक पोकळी निर्माण झाली असे मत समाजातील सर्व स्तरातील लोकांद्वारे व्यक्त केले जात आहे. त्यांच्या मागे त्यांची पत्नी, मुलगे, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
त्यांचा पुण्यानुमोदन व शोकसभा कार्यक्रम रविवार दिनांक २१ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ठीक दहा वाजता भटवाडी, घाटकोपर येथे शाखा क्रमांक २८६, यांच्या अधिपत्याखाली आयोजित करण्यात आला आहे, तरी सर्व कार्यकर्त्यांनी सदर ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या आदर्शाला श्रद्धांजली अर्पण करावी अशी विनंती बौद्धजन पंचायत समिती द्वारे काढलेल्या परिपत्रकात करण्यात आली आहे.