
स्थैर्य, फलटण, दि. ०९ ऑगस्ट : नांदणी (जि. कोल्हापूर) येथील जैन मठातील माधुरी (महादेवी) नावाच्या हत्तीणीला गुजरात राज्यातील वनतारा येथे नेल्याने जैन समाजात तीव्र असंतोष पसरला आहे. या हत्तीणीला पुन्हा नांदणी मठात परत पाठवण्यासाठी राष्ट्रपतींनी लक्ष घालावे, या मागणीसाठी जैन सोशल ग्रुप, फलटणच्या वतीने प्रांताधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निवेदन देण्यात आले.
महादेवी हत्तीण ही जैन समाजाच्या प्रत्येक धार्मिक कार्यक्रमाचा अविभाज्य भाग होती. तिला परत आणण्याच्या मागणीसाठी जैन सोशल ग्रुपचे अध्यक्ष श्रीपाल जैन, सचिव नीना कोठारी, माजी अध्यक्ष राजेंद्र कोठारी, डॉ. अशोक व्होरा, डॉ. मिलिंद दोशी यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने फलटणच्या प्रांताधिकारी सौ. आंबेकर यांची भेट घेऊन निवेदन दिले.
प्रांताधिकारी सौ. आंबेकर यांनी निवेदनाचा स्वीकार केला असून, ते लवकरात लवकर राष्ट्रपती कार्यालयाकडे पाठवण्यात येईल, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.