स्थैर्य, मुंबई, दि १३: बेळगावात कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमावाद पुन्हा पेटला असताना शिवसेना खासदार संजय राउत यांनी कर्नाटक सरकारला आपल्याच भाषेत इशारा दिला आहे. बेळगावात मराठी माणसांवर अत्याचार होत आहेत. या अत्याचारांची कुणी दखल घेत नसेल तर मग महाराष्ट्र सरकारला पूर्ण ताकदीने बेळगावात उतरावे लागेल. डोकी फुटली तर दिल्लीला रडत जाऊ नका. कर्नाटकमध्ये उद्भवलेल्या परिस्थितीला केंद्र सरकारच जबाबदार आहे असा हल्लाबोल राउत यांनी केला.
राउत पुढे बोलताना म्हणाले, बेळगावात मराठी माणसांसह शिवसेनेच्या कार्यलयांवर सुद्धा हल्ले होत आहेत. त्या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या परिस्थितीला केंद्रातील भाजप सरकार जबाबदार आहे. पश्चिम बंगालमध्ये हल्ले झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी चिंता व्यक्त करतात. पण, जेव्हा बेळगावात मराठी माणसांवर हल्ले होतात, तेव्हा मात्र पंतप्रधान आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा काहीच बोलत नाहीत.
आमच्याकडेही बंदूका आहेत
बेळगावात मराठी माणसांवर होणारे हल्ले हा एखाद्या राजकीय पक्षाचा किंवा केवळ सरकारचा विषय नाही. यात केंद्र सरकारचा दोष दिसून येत आहे. एक सर्वपक्षीय शिष्टमंडळ तत्काळ बेळगावला पाठवायला हवे. असे नाही केल्यास सांगली आणि कोल्हापूरातील असंख्य नागरिकच बेळगावात शिरणार. बेळगाव हा देशातला भाग आहे की नाही? आम्ही मराठी माणसे जेव्हा तिकडे जायचे बोलतो तेव्हा आम्हाला बंदूका दाखवल्या जातात. मी बेळगावला जाऊ शकतो. आमच्याकडे सुद्धा बंदूका आहेत असा इशारा देखील राउत यांनी दिला आहे.