
स्थैर्य, वाखरी, दि. १० सप्टेंबर : बारामती येथील डॉ. शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालयातील कृषीदूत विद्यार्थ्यांनी, कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत वाखरी गावात शेतकऱ्यांसाठी ‘ऊस पिकावरील लोकरी मावा कीड नियंत्रण’ या विषयावर चर्चासत्र आयोजित केले. या उपक्रमातून शेतकऱ्यांमध्ये या किडीविषयी जनजागृती करण्यात आली.
महात्मा फुले कृषी विद्यापीठाशी संलग्न असलेल्या या महाविद्यालयातील अंतिम वर्षाचे विद्यार्थी, कृषीदूत सार्थक खरात, पृथ्वीराज जगताप, यशवर्धन कवटकर, निखिल कालेकर, वरद देशमुख, प्रथमेश कुंभार, ओमकार कोकाटे आणि आदित्य केकन यांनी हे चर्चासत्र घेतले. यावेळी त्यांनी ऊसावरील लोकरी मावा या किडीचे नियंत्रण करण्यासाठीच्या सांस्कृतिक, रासायनिक आणि जैविक पद्धती व उपाययोजनांची सविस्तर माहिती शेतकऱ्यांना दिली.
या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे डॉ. संतोष मोरे आणि प्राध्यापक शरद दळवे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. कृषीदूत विद्यार्थ्यांनी थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केल्यामुळे, या कीड नियंत्रणाबाबतच्या शास्त्रीय पद्धती समजण्यास मोठी मदत झाली. या यशस्वी चर्चासत्रामुळे वाखरी गावातील शेतकऱ्यांमध्ये लोकरी मावा नियंत्रणाबाबत जागरूकता निर्माण झाली आहे.