शाहूपुरीचा पाणीप्रश्न कायमचा सोडवल्याचे मनस्वी समाधान – आ. शिवेंद्रसिंहराजे; नागरिकांसमवेत उत्साहात केले जलपूजन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.०१ जानेवारी २०२२ । सातारा । काही लोकांना नागरिकांच्या प्रश्नांचे काहीही देणेघेणे नसते. पण, निवडणूक जवळ आली की, अशा लोकांना राजकीय स्वार्थ स्वस्थ बसू देत नाही आणि मग हेच लोक जनतेबद्दल खोटा कळवळा आणून मोठमोठ्या थापा मारतात. मात्र जनता सुज्ञ झाल्याने अशा भूलथापांना भुलण्याचे दिवस गेले आहेत. शाहूपुरीचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केला आणि निधी उपलब्ध करून दिला. आज शाहूपुरीत प्रत्यक्ष पाणी पोहचले असून पाणीप्रश्न कायमचा सोडवता आला याचे आपल्याला मनस्वी समाधान आहे, असे भावनिक उद्गार आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी काढले.
शाहूपुरीसाठीच्या कण्हेर पाणी पुरवठा योजनेच्या जलपूजन आणि लोकार्पण सोहळ्याप्रसंगी आ. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या हस्ते ५ सुवासिनींना जलकुंभ देऊन या योजनेचे लोकार्पण करण्यात आले. तसेच सुमारे १० वर्षांपूर्वी दुषित पाण्यामुळे मृत्यू पावलेल्या ७ महन्यांच्या गर्भवती भगिनीच्या पवित्र स्मृतीस ही योजना समर्पित करण्यात आली. यावेळी नगरसेवक अविनाश कदम, शाहूपुरी ग्रामविकास आघाडीचे भारत भोसले, उप कार्यकारी अभियंता माने, योजनेचे अभियंता एस.आर. अग्रवाल, मेंटेनन्स प्रमुख आवळे, योजनेचे ठेकेदार दीपक भिवरे, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्रकुमार मोहिते ,नवनाथ जाधव, सुहास वहाळकर, सौ.शोभाताई केंडे, सौ.निलमताई देशमुख, सौ.माधवीताई शेटे, माजी उपसरपंच विकास देशमुख, विजय गार्डे,  तुषार जोशी, नितीन तरडे, राजेंद्र केंडे, नरेश जांभळे, महेश जांभळे, चंदू देवरे, पिंटू गायकवाड, रामदास धुमाळ, आप्पा गोसावी, संकेत परामणे, पप्पू बालगुडे, पिंटू कडव, रमेश इंदलकर, मनोज कडव, दीपक अवकीरे,कमलेश जाधव, गणेश वाघमारे, सुरेश शेटे, अनिल पोळ, तात्या चोरगे, सुभाष गुरसाळकर, सुरेश पांढरपट्टे, नेताजी कुंभारे, प्रा.एम.जे.फडतरे, प्रा.आर.एस.जगताप, राम रेवाळे यांच्यासह महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कण्हेर धरण बांधकामावेळी स्व.भाऊसाहेब महाराजांनी दूरदृष्टी ठेवून भविष्यात सातारा शहर व परिसरासाठी कण्हेरच्या पाण्याची गरज लागू शकते, यासाठी धरणस्थळी स्वतंत्र तांत्रिक तरतूद केल्यानेच आज एवढ्या सहजासहजी या पाणी योजनेचा लाभ होत आहे. मध्यंतरीच्या काळात दिलीपजी सोपल पाणी पुरवठा मंत्री असताना ही ३१ कोटीची योजना मी स्वतः पाठपुरावा करून मंजूर करून घेतली होती. सुदैवाने लोकवर्गणीची अट रद्द झाल्याने ही योजना मार्गी लागण्यातील मुख्य अडथळा दूर होऊन नंतर लागणारा अतिरिक्त १२ कोटींचा निधी सुध्दा राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री ना. अजितदादा पवार यांचेकडून मंजूर करून घेतला व त्याची फलश्रुती म्हणून आज या योजनेचे पाणी प्रत्यक्षात शाहूपुरीत येऊन दाखल झाले आहे. विरोधक म्हणत आहेत की स्व.भाऊसाहेब महाराजांमुळे २० वर्ष शाहूपुरीस पाण्यापासून वंचित राहावे लागले. त्यांचा हा आरोप धादांत खोटा आहे. कारण २० वर्षांचा विचार करता हेच १० वर्ष खासदार होते, शाहूपुरी येथे यांच्याच गटाची सत्ता होती. त्याचा विचार करता यांना कोणी अडवले होते? त्यामुळे या सगळ्या भूलथापा आहेत. यांना विकासाशी काहीही घेणंदेणं नाही. यांना नागरिक फक्त निवडणूक आली की दिसतात, बाकी साडेचार वर्षे यांनाच हुडकायची वेळ जनतेवर येत असते आणि हे वास्तव जनतेला माहिती आहे. त्यामुळे अशा भूलथापांना बळी न पडता शाश्वत विकासासाठी विधायक विचारांच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी याप्रसंगी केले.

Back to top button
Don`t copy text!