जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेमध्ये मुधोजी हायस्कूलच्या कुस्तीपटूंचा डंका

तीन कुस्तीपटूंची विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. ५ ऑक्टोबर २०२४ | फलटण |
जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा २० ते २१ सप्टेंबरदरम्यान खंडाळा येथील राजेंद्र विद्यालय, खंडाळा येथे पार पडल्या. या स्पर्धेमध्ये मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, फलटणच्या तीन विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले व विभागस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली आहे.

या स्पर्धेमध्ये १४ वर्षे वयोगटातील तीन खेळाडू सहभागी झाले होते. त्यामध्ये समर्थ संतोष शिंदे यांने ६५ किलो वजनी गटात सलग दोन कुस्त्या जिंकून अंतिम फेरीत प्रवेश करून प्रतिस्पर्धी खेळाडूवर मात करत प्रथम क्रमांक मिळवून ‘गोल्ड मेडल’ मिळविले आहे.

दुसर्‍या दिवशी १७ व १९ वर्षांखालील मुलांच्या ग्रीको रोमन आणि १४, १७ व १९ वर्षांखालील मुलींच्या फ्री स्टाईल कुस्ती स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेमध्ये मुधोजी हायस्कूलच्या ग्रीको रोमन कुस्ती प्रकारामध्ये दोन मुले आणि फ्री स्टाईल कुस्ती स्पर्धेत ४ मुली अशा एकूण ६ खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता.

मुलींच्या फ्री स्टाईल कुस्ती स्पर्धेत कु. गौरी रमेश चव्हाण हिने ६५ किलो मुलींच्या गटात झालेल्या कुस्ती स्पर्धेत प्रतिस्पर्धी खेळाडू वरती मोठ्या गुणांच्या फरकाने मात करत प्रथम क्रमांक मिळविला व गोल्ड मेडलची मानकरी ठरली तर कु. श्रुती नवनाथ चव्हाण ही ६९ किलो वजनी गटात सलग दोन कुस्त्या जिंकून फायनलमध्ये कराडच्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली व गोल्ड मेडल प्राप्त केले.

विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या कुस्तीपटूंना विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटीच्या क्रीडा समितीचे चेअरमन शिवाजीराव घोरपडे, प्रशासन अधिकारी अरविंद निकम, तपासणी अधिकारी दिलीप राजगुडा, प्राचार्य सुधीर अहिवळे, माध्यमिकचे उपप्राचार्य नितीन जगताप, ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य सोमनाथ माने, पर्यवेक्षिका सौ. पूजा पाटील, फलटण एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे सदस्य तसेच सर्व शिक्षक वृंद यांनी यशस्वी कुस्तीपटूंचे व त्यांना मार्गदर्शन करणारे प्रशिक्षक (वस्ताद) डी. एन. जाधव यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.


Back to top button
Don`t copy text!