दैनिक स्थैर्य । दि. १८ एप्रिल २०२३ । फलटण । रयत शिक्षण संस्थेचे, श्री जितोबा विद्यालय जिंती या विद्यालयाची माजी विद्यार्थिनी कु. प्रतिक्षा धनंजय पोतेकर हिची सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये अॅग्रीकल्चर फील्ड ऑफिसर स्केल वन पदी नुकतीच अभिनंदनीय निवड झाली आहे. याबद्दल विद्यालयाच्या वतीने तिचा विशेष सत्कार आयोजित करण्यात आला होता. स्कूल कमिटीचे ज्येष्ठ श्री राजेंद्र रणवरे,श्री पी.एन. रणवरे, श्री एम. एन. रणवरे, मुख्याध्यापिका सौ. शिंदे व्ही. एस. यांच्या हस्ते तिचा शाल, श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री जगदेवराव रणवरे, पालक श्री धनंजय पोतेकर, जेष्ठ शिक्षक श्री ताराचंद्र आवळे, श्री प्रतिक पोतेकर, श्री शाश्वत पोतेकर,श्री ए. आर. सोळंकी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी श्री पी.एन. रणवरे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी स्पर्धेत टिकून राहण्यासाठी सतत प्रयत्न केले पाहिजेत. हार न मानता यशाच्या दिशेने झेपावत गेले पाहिजे व उत्तुंग यशाला गवसणी घातली पाहिजे. यासाठी दर्जेदार शिक्षण काळाची गरज आहे ते सध्या सहज उपलब्ध होत आहे त्यामुळे मिळालेल्या संधीचा फायदा घेतला पाहिजे.
श्री एम. एन. रणवरे म्हणाले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य दिशा देणारे श्री जितोबा विद्यालय हे नेहमी विविध उपक्रम राबवत असते याचा लाभ परिसरातील विद्यार्थी व पालक यांनी घेतला पाहिजे व गावाचा नावलौकिक वाढविला पाहिजे. मुख्याध्यापिका सौ शिंदे व्ही. एस. म्हणाल्या की, प्रतीक्षा पोतेकर हिने अल्पावधीत यश संपादन करून शाळेचा व गावाचा नावलौकिक वाढविला आहे. तिच्या या यशामुळे विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळून स्पर्धा परीक्षांची गोडी निर्माण होईल.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, प्रास्ताविक व स्वागत विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक व समुपदेशक श्री ताराचंद्र आवळे यांनी केले.कार्यक्रमाचे आभार श्री ए. आर. सोळंकी यांनी मानले. यावेळी प्रतीक्षा पोतेकर हिचे उपशिक्षिका सौ. पौर्णिमा जगताप, सौ गौरी जगदाळे, सौ. अर्चना सोनवलकर, सौ. शीतल बनकर, श्री गजानन धर्माधिकारी, श्री राजेंद्र घाडगे, कु.स्नेहल पोतेकर व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.