दैनिक स्थैर्य | दि. ५ जुलै २०२३ | फलटण |
श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपकराव चव्हाण, श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासह सर्वच राजे गटाचे खाजगी सचिव (पी.ए.) म्हणून गेली तीस वर्ष कार्यरत असणारे श्री. सोपानराव नामदेव जाधव (रा. उपळवे) यांचे एकलोते एक चिरंजीव प्रशांतराज सोपानराव जाधव यांची २०२० च्या बॅचमधून महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेतून पोलिस सब इन्स्पेक्टरपदी निवड झाली आहे. ४ जुलै २०२३ रोजी हा निकाल जाहीर झाला आहे. या निवडीमुळे त्यांचे नातेवाईक व त्यांच्यावर प्रेम करणार्या सर्वच स्तरातील सर्वच पक्षांच्या व सर्वच क्षेत्रातील नागरिकांमधून आनंद व्यक्त करण्यात आला आहे.
चिरंजीव प्रशांतराज यांनी सातारा येथील अरविंद गवळी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मेकॅनिकल इंजिनियरची पदवी संपादित केली. त्यानंतर पुणे-मुंबईमध्ये साध्या पगारावर नोकरी करण्यापेक्षा त्यांचे वडील सोपानराव जाधव यांना प्रशांतराज सांगितले की, एमपीएससीमार्फत परीक्षा देऊन अधिकारी बनायचं आहे आणि त्यासाठी मला तुमच्या सहकार्याची अजून दोन वर्ष आवश्यकता आहे. आपल्या आत्मविश्वासाच्या बोलीवर वडिलांचा शब्द घेतला व सरळ पुण्याचा रस्ता प्रशांतराज यांनी पकडला. तिथं फलटणचे माजी प्रांत व माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी (साहेब) पुणे यांच्या चाणक्यमंडल अकॅडमी, सदाशिव पेठ, पुणे येथे त्यांनी चार वर्षांपूर्वी अधिकृतपणे प्रवेश घेऊन त्या ठिकाणी तयारी सुरू केली. त्यानुसार प्रशांतराज पहिल्याच प्रयत्नात पोलीस सब इन्स्पेक्टर झाले. मात्र, याच दिलेल्या परीक्षेच्या निकालाचा सर्व खेळखंडोबा झाला. निकाल कधी दोन वर्ष कोरोनामुळे पुढे गेला तर कधी एसीबीसी व मराठा आरक्षणाच्या ढिसाळ नियोजनामुळे पेंडिंग पडलेल्या न्यायालयीन घोंगड्यापुढे सदरचा निकाल ४ जुलै रोजी तब्बल तीन ते चार वर्षांनी एमपीएससीच्या पटलावर अधिकृतपणे जाहीर करण्यात आला.
चिरंजीव प्रशांतराज सोपानराव जाधव यांची पोलीस सबइन्स्पेक्टर पदासाठीची नियुक्ती झाल्याचे जाहीर होताच कुटुंबियांना व त्यांच्या आप्तेष्ट नातेवाईकांना आनंद गगनात मावेनासा झाला. सोपानराव जाधव यांची प्रथम घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्यामुळे मुलाचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून त्यांनी प्रशांतराज यांना व त्यांच्या दोन्ही बहिणी माधुरी व कांचनमाला यांना सातारा येथील शाहू बोर्डिंग नंबर एक शाहू बोर्डिंग नंबर दोन व रयत शिक्षण संस्थेचे लक्ष्मीबाई पाटील वसतिगृह, सातारा येथे शिक्षणासाठी घातले. मुलांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण रयत शिक्षण संस्थेमार्फत सातारा येथे पूर्ण करून घेतले. त्यानंतर त्यांनी बारावीनंतरचे प्रशांतराज यांचे पुढील शिक्षण सावकार अरविंद गवळी इंजिनिअरिंग कॉलेज, सातारा येथे मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये पूर्ण केले.
प्रशांतराज मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी ६८ टक्क्यांनी पास झाले. त्यानंतर एमपीएससी च्या २०२० मध्ये झालेल्या प्रथम परीक्षेत प्रशांतराज पास झाले आहे. मात्र, मेन्स परीक्षा पुन्हा न्यायालयात अडकली. निकाल पुन्हा पुन्हा रखडत गेला. त्यानंतर ४ जुलै २०२३ रोजी हा परीक्षेचा निकाल जाहीर झाला. त्यात प्रशांतराज यांची १८८ ची रँक आहे.
सबइन्स्पेक्टरपदी निवड झाल्याबद्दल फलटणसह सातारा जिल्हा, पुणे, मुंबई येथून त्यांच्यावर प्रेम करणारे व त्यांच्या वडिलांवर प्रेम करणारे व उपळवे परिसरातील नागरिकांनी त्यांचे फोनवरून व मेसेजद्वारे अभिनंदन केले आहे.
दरम्यान, विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, आमदार माननीय दीपकराव चव्हाण, फलटण मार्केट कमिटीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्यासह यांनीही प्रशांतराज यांचे अभिनंदन केले आहे व पोलीस सबइन्स्पेक्टर पदाच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
चिरंजीव प्रशांतराज जाधव हे सध्या पुण्याच्या चाणक्य अकॅडमी येथे कार्यरत आहेत.