स्थैर्य, फलटण : एमपीएससीच्या राज्यसेवा परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये फलटण तालुक्यातील तुषार लक्ष्मणराव गुंजवटे यांची नायब तहसीलदारपदी निवड झाली आहे. तुषार गुंजवटे याचे मुळ गाव झिरपवाडी असून त्याचे प्राथमिक शिक्षण मालोजीराजे प्राथमिक विद्या मंदिर, फलटण येथे तर माध्यमिक शिक्षण यशवंतराव चव्हाण पॉलीटेक्निक हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण येथे झाले. त्यानंतर शासकीय इंजिनिअर कॉलेज कराड येथे ई अँण्ड टी. सी. इंजिनिअरिंगचे शिक्षण झाले. ऑल इंडिया श्री शिवाजी राजे मेमोरियल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे येथे डिग्ग्रीचे शिक्षण पूर्ण केले. सध्या ते टाटा कन्सलटिंग सर्विस पुणे येथे नोकरीस होते.
त्यांचे वडील महाराष्ट्र राज्य आयडियल बहुजन टिचर्स असोसिएशनचे नेते लक्ष्मणराव गुंजवटे हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मिंडवस्ती (साठेफाटा) येथे वरिष्ठ मुख्याध्यापक असून आई सौ. छाया गुंजवटे या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरकरवाडीच्या मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहेत.
तुषार याच्या निवडी बद्दल त्याचे महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, फलटण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण-कोरेगाव विधानसभेचे आमदार दिपक चव्हाण, फलटण तालुका पंचायत समितीचे सभापती श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर, पंचायत समिती सदस्य सचिन रणवरे, कोळकीच्या सरपंच पुष्पांजली नाळे, झिरपवाडीचे सरपंच सचिन गुंजवटे, कोळकीचे माजी सरपंच दत्तोपंत शिंदे व विविध शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी व फलटण तालुक्यातील विविध मान्यवरांनी अभिनंदन केले.
एकूण 420 परीक्षार्थी यांची निवड यादी आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रसिद्ध केली आहे. 13 जुलै ते 15 जुलै 2019 रोजी ह्यासाठी मुख्य परीक्षा घेण्यात आली होती. पूर्व परीक्षेला एकूण 3,60,990 विद्यार्थी बसले होते. यातून मुख्य परीक्षेला 6825 विद्यार्थी पात्र ठरले होते आणि आज 420 यशस्वी विद्यार्थी हे अंतिम निवड यादी मध्ये पात्र ठरले आहेत.