दैनिक स्थैर्य | दि. १२ जून २०२३ | फलटण |
फलटणचे सुपुत्र गणेश अंकुश शिंदे याची पहिल्याच प्रयत्नात ‘एनडीए’मध्ये निवड झाली आहे. या यशाबद्दल विधान परिषदेचे माजी सभापती व विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी गणेश शिंदे याची भेट घेऊन त्याचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
गणेश शिंदे याचे फलटण येथील श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मिडीयम स्कूल येथे ४ थी पर्यंतचे शिक्षण झाल्यावर सातारा येथे सैनिक स्कूलमध्ये १२ वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करत त्याने ‘एनडीए’ची परीक्षा दिली. कोरोनाच्या काळात कोणतेही प्रशिक्षण न घेता, कोणताही क्लास न लावता त्याने सातत्याने जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर या परीक्षेत यश संपादित केले.
गणेशचे वडील सैन्यदलात सेवा बजावत असल्यामुळे सततच्या बदलीमुळे त्याच्या आईने त्यांच्यासोबत न जाता मुलाच्या शिक्षणाला प्राधान्य दिले आणि आज त्यांच्या आईने केलेल्या कष्टाचे आज चीज झाले आहे.
‘एनडीए’साठी देशात चार ते पाच लाख मुले लेखी परीक्षेकरता बसतात. त्यातील दहा हजार मुले पुढील सर्व चाचणी होऊन गुणवत्ता यादीनुसार निवडली जातात. या दहा हजार मुलांच्या पाच दिवस सैन्य दलासाठी आवश्यक त्या चाचण्या घेऊन चारशे मुले एनडीएच्या प्रवेशासाठी निवडली जातात. गणेशने सर्व चाचण्या सहजपणे यशस्वी केल्या व ‘एनडीए’मध्ये दाखल झाला.
गणेशचे वडील श्री. अंकुश शिंदे सैन्यादलात ‘गनर’ या पदावर होते. गणेशची आई सौ. लतिका मुलांच्या शिक्षणासाठी फलटणला स्थायिक झाल्या. मुलाचा कल व आवड लक्षात घेऊन त्यांनीही ‘एनडीए’ प्रवेश परीक्षेकरीता अभ्यास करण्यास प्रोत्साहन दिले. त्याच्या या यशात गुरूजन, कुटुंबीय यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
पुढच्या वर्षी मे महिन्यात ‘एनडीए’चे तीन वर्षाचे प्रशिक्षण संपल्यावर त्याने नेव्हीमध्ये रूची दाखवल्यामुळे ‘बी. टेक.’ पदवी गणेशला मिळणार आहे. ‘आयएनए’ केरळ येथे एक वर्षाचे पुढील सर्विस प्रशिक्षण पूर्ण केल्यावर इंडियन नेव्हीमध्ये सब लेफ्टनंट रँकवर त्याची नियुक्ती होणार आहे.
या यशाबद्दल गणेशचे श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर (ताईसाहेब) व शिंदे, पोळ कुटुंबीय यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
गणेश शिंदे याच्या ‘एनडीए’तील निवडीमुळे फलटणच्या प्रशासकीय अधिकार्यांच्या यादीत अजून एक नाव झळकणार आहे.