दैनिक स्थैर्य । दि. २३ नोव्हेंबर २०२२ । सातारा । राष्ट्रीय आरोग्य अभियान, महाराष्ट्र शसन व इपिलिप्सी फाऊंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने फेफरे, अपस्मार, इपिलिप्सी शिबिर जिल्हा रुग्णालय सातारा येथे पार पडले.
शिबिरामध्ये डॉ. निर्मल सूर्या व पुणे, मुंबई येथील नामांकीत 11 न्युरॉलॉजीस्ट, न्युरोसर्जन, बालरोग तज्ञ, 3 स्पिच थेरपीस्ट, फिजीओथेरपीस्ट, 2 सायकॉलॉजीस्ट, 3 ऑक्युपेशनल थेरपीस्ट तसेच जिल्हा रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टर यांनी सेवा दिल्या.
शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना डॉ. निर्मल सूर्या यांनी आजाराची लक्षणे, उपचार व फिट आलेल्या रुग्णाची कशी काळजी घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण म्हणाले, डॉ. निर्मल सूर्या व टिम यांच्या फाऊंडेशनचे कार्य मोलाचे असून हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. आगामी काळात अशी शिबीरे घेण्यास जिल्हा रुग्णालय व आरोग्य विभाग सदैव कटीबध्द राहील.
डॉ. सौरभ सावंत व डॉ. सूर्या यांनी जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर व खासगी वैद्यकीय व्यवसायीक डॉक्टर यांना इपिलिप्सी आजाराबाबत निदानासाठी उपलब्ध प्रगत तंत्रज्ञान, नवीन औषाधोपचार याबाबत मार्गदर्शन केले. आगामी काळात रुग्णसेवा देण्यात याचा नक्की फायदा होईल असा विश्वास सर्व डॉक्टर्सनी व्यक्त केला.
या शिबिराचा 338 रुग्णांनी फायदा घेतला. यामधील 38 रुग्णांची ईसीजी करण्यात आली. 18 रुग्णांचे सी टी स्कॅन, 50 रुग्णांना फिजीओथेरपी व 30 रुग्णांना स्पीच थेरपी देण्यात आली. रुग्णांना तज्ञांच्या सल्ल्यानुसार तीन महिन्यांची औषधे देण्यात आली.
शिबीरास पुणे विभागाचे उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार यांनी भेट देऊन सर्व वैद्यकीय अधिकारी, रुग्ण, नातेवाईक यांच्याशी संवाद साधला.