जनसामान्यात ‘हरेकृष्ण’ पाहणे हीच खरी ईशसेवा’ – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १८ डिसेंबर २०२१ । मुंबई । पैसा, शक्ती, विद्या अनेकांकडे असते परंतु त्याचा उपयोग समाजाच्या हितासाठी करण्याची प्रेरणा कमी लोकांना मिळते. ईश्वराची पूजा करणे सोपे आहे; परंतु जनता जनार्दनाच्या आत जो ‘हरेकृष्ण’ आहे त्याची सेवा करणे हे श्रेष्ठ कार्य आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

कोरोना काळात राज्यातील गरजू लोकांना अन्नामृत  फाउंडेशनच्या माध्यमातून तयार शिजवलेले भोजन देण्यात सहकार्य करणाऱ्या विविध दानशूर उद्योग संस्था, कंपनी व अन्न वितरण संस्थांचा राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

इस्कॉनची सहयोगी संस्था असलेल्या अन्नामृत फाउंडेशनतर्फे राजभवन येथे अन्नदान कार्यात सहयोग देणाऱ्या संस्थांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या ‘आभार’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाला आमदार मंगल प्रभात लोढा, अन्नामृत फाउंडेशनचे संस्थापक व मुख्याधिकारी राधा कृष्ण दास, विश्वस्त कुशल देसाई व नुपूर देसाई प्रामुख्याने उपस्थित होते.

राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले, येशू ख्रिस्त यांनी दानाचे महत्व विशद केले होते. भारतात प्राचीन काळापासून करुणेचा भाव आहे. करुणेमुळेच युवराज गौतम हे भगवान बुद्ध झाले व अनेक देशात बौद्ध धर्माचा प्रचार झाला. दया व करुणा मनुष्याला देवत्व प्रदान करते व समाजात समता प्रस्थापित करण्यास मदत  करते,  अन्नामृत फाउंडेशनच्या अन्नदानाच्या कार्यातून अनेक संस्था व व्यक्तींना प्रेरणा मिळेल, असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.

अन्नामृत फाउंडेशनच्या माध्यमातून २.६० कोटी तर सहयोगी संस्थांच्या माध्यमातून १५ कोटी थाळी  भोजन वाटण्यात आल्याची माहिती संस्थेचे विश्वस्त कुशल देसाई यांनी यावेळी दिली. अन्नामृत फाउंडेशनच्या कार्याला शालेय मध्यान्ह भोजन योजनेपासून सुरुवात झाली व आज लाखो लोकांना उत्कृष्ट भोजन दिले जाते असे संस्थापक राधा कृष्ण दास यांनी यावेळी सांगितले.

यावेळी महानगर गॅस लिमिटेड, रोटरी क्लब ऑफ बॉम्बे क्वीन्स नेकलेस चॅरिटेबल ट्रस्ट, दाणी फाउंडेशन, पिरामल ग्रुप, अपार इंडस्ट्रीज लिमिटेड, कोटक फॅमिली फाउंडेशन, बारवाले कुटुंबीय,केशव सृष्टी व अन्नामृत फाउंडेशन यांसह विविध संस्थांचा राज्यपालांच्या हस्ते मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.


Back to top button
Don`t copy text!