
स्थैर्य, फलटण, दि. 26 ऑगस्ट : फलटण शहर व परिसरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. शहरात मोकाट कुत्र्यांची टोळ्या दिवसरात्र फिरत आहे. अन्नाच्या शोधात मोकाट कुत्री तुटून पडतात. आपसात भांडणे होतात. मोठमोठ्यांनी ओरडत असतात. दुचाकी, चारचाकी वाहनधारकांना वाहने चालवताना अचानक आडवी येतात, त्यामुळे अपघात घडत आहेत. कधीकधी मोकाट कुत्री जेष्ठ नागरिक, वयोवृद्ध महिला नागरिकांना रस्त्यावर चालताना धावून येतात.
लहान मुले बालके यांना घेऊन रस्त्यावर चालताना महिलांची तारांबळ उडते.सकाळी शाळेच्या वेळात मुलांना शाळेत ने आण करण्याकरिता प्रवसा करताना महिला पालकांच्या व मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.मोकाट कुत्र्यांच्या मुळे नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त न केल्यामुळे मोकाट कुत्र्यांची पैदास वाढत असून आगामी काळात मोकाट कुत्र्यांचा प्रश्न गंभीर स्वरूप धारण करेल.
मोकाट कुत्र्यांच्या मुळे संसर्गजन्य आजार पसरण्याची भिती पशुवैद्यक क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहेत. मोकाट कुत्र्यांमधील अनेक कुत्री तार कंपाऊंड वॉल कंपाऊंड मधून शिरताना जखमी होतात. जखमी मोकाट कुत्री शहरातील रस्ते पाणीपुरवठा लाईन,नळ कनेक्शन ठिकाणी इत्यादी क्षेत्रात विसावतात. बंगले, अपार्टमेंट, फ्लॅट, मंदिरं,शाळा, दुकाने, हॉस्पिटल, हॉटेल, शासकीय कार्यालये,खाजगी आस्थापना, नविन बांधकाम व्यावसायिक यांच्या परिसरात मोकाट कुत्र्यांचा वावर असतो. अशा पार्श्वभूमीवर फलटण शहरातील मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट वाढल्याने नागरिकाच्यात घबराट निर्माण झाली आहे. फलटण शहरातील नागरिक, महिला, वयोवृद्ध व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक, लेकुरवाळ्या महिला,दुचाकी व चारचाकी वाहनधारक सध्या जीव मुठीत घरून घराबाहेर पडताना दिसत आहेत. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी प्रशासनाने तातडीने धडक मोहीम राबवण्याची आवश्यकता आहे, अशी भावना नागरिक व्यक्त करीत आहेत. वयोवृद्ध जेष्ठ नागरिक मोकाट कुत्र्यांच्या भितीच्या सावटाखाली घरा बाहेर पडायला घाबरत आहेत.