स्थैर्य, सांतारा, दि.२२: सर्व कोरोना लसीकरण केंद्रावर अनावश्यक गर्दी होवून परिणामी कोरोना विषाणूचा संसर्गामध्ये वाढ होण्याची शक्यता असल्याने तसेच नागरिक-नागरिकांमध्ये आणि नागरिक व लसीकरण केंद्रावर सेवा देणारे कर्मचारी यांचेमध्ये वाद-विवाद होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने सातारा जिल्हयातील सर्व कोरोना लसीकरण केंद्राचे परिसरात व त्या सभोवतालच्या 100 मिटर परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 मधील तरतुदी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी लागू केले आहेत.
या आदेशानुसार सर्व कोरोना लसीकरण केंद्रावर नागरिकांनी मास्क परीधान करून रांगेत उभे राहुन प्रत्येक व्यक्ती मध्ये किमान 3 फुटांचे अंतर ठेवून सोशल डिस्टन्सचे पालन करणे बंधन राहील. तसेच अनावश्यक गर्दी करू नये. सर्व कोरोना लसीकरणाकरिता आवश्यक ती ऑनलाईन नोंदणी करूनच कोरोना लसीकरण केंद्रावर टोकन प्रणालीचा अवलंब करणे आवश्यक आहे. कोरोना (COVID-19) चे अनुषंगाने शासनाने वेळोवेळी विहीत केलेल्या अटी व शर्तींचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहील.
या आदेशाची अंमलबजावणी करण्यास संबंधीतांनी टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधीतांविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 ते 60, व भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 नुसार तसेच भारतीय साथरोग अधिनियम 1897 अन्वये दंडनीय / कायदेशीर कारवाई करण्यात येईल असेही, आदेशात नमूद करण्यात आले आहे.