दैनिक स्थैर्य । दि. ०१ ऑक्टोबर २०२२ । पुणे । प्रचंड वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरणारा चांदणी चौकातील पूल आज मध्यरात्री पाडण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर चौक परिसरात १४४ कलम लागू करण्यात आलं आहे. त्यामुळं इथं लोकांनी गर्दी करता येणार नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली आहे.
पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं, “चांदणी चौक परिसरात कलम १४४ लागू होणार आहे. सगळ्या पूल पाडण्याची सर्व तयारी व्यवस्थित असेल, स्फोटकांचं कनेक्शन नीट असेल तर स्फोट वेळेआधीच केला जाईल. पहाटे १ ते २ वाजण्याच्या वेळेत पूल पाडण्यात येईल.
यासाठी दोन्ही मार्गावरील वाहतूक रात्री ८ नंतर थांबवण्याचे काम सुरू होईल. तत्पूर्वी संध्याकाळी ६ वाजल्यानंतर परिसर निर्मनुष्य करायला सुरुवात होईल. लवकरात लवकर हा पूल पाडून नागरिकांची गैरसोय होणार नाही असा प्रशासनाचा प्रयत्न आहे. यानंतर सकाळी लवकरात लवकर या रस्त्यावरील वाहतूक पूर्ववत केली जाईल.