स्थैर्य, दि.२६: आज महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांची भेट झाली आहे. मुंबईतील एका हॉटेलमध्ये ही भेट झाल्याची माहिती आहे. या दोघांच्या भेटीच्या चर्चेचा तपशील गुलदस्त्यात असले, तरी अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
दरम्यान, संजय राऊत देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेणार असल्याचे विधान परीषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सांगितले आहे. तसेच, या मुलाखतीच्या अनुशंगानेच ही भेट झाल्याचेही त्यांनी सांगितले. याबाबत दरेकर म्हणाले की, ‘राजकारणात दोन अधिक दोन चार कधीच होत नाही. शिवसेना ज्या अर्थी काँग्रेससोबत युती करू शकते तर राजकारणात काहीही होऊ शकते. या भेटीचा आनंदच आहे. पण, महाराष्ट्रातील जनतेला देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्या भेटीची काहीही माहिती नाही. राऊतांच्या एका भेटीनं लगेच राजकीय भूकंप होणार नाही. त्यांनी अनेकदा अशा अनेक भेटी घेतल्या आहेत. प्रत्येकवेळी वेगवेगळी कारणंही दिली आहेत.’
मुलाखतीसाठी भेट
‘संजय राऊत यांनी सामनासाठी देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेण्याची इच्छा प्रदर्शित केली होती. त्यावर या मुलाखतीसाठी एकदा भेटण्याचे ठरले होते. ती संपूर्ण मुलाखत अनएडिटेड जावी, अशी देवेंद्र फडणवीस यांची इच्छा असल्याने एकदा भेटून प्रारूप ठरविण्यासाठी ही भेट झाली. बिहार निवडणुकीतून परतल्यानंतर ही मुलाखत देण्याचे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना सांगितले आहे. या भेटीला कुठलाही राजकीय संदर्भ नाही,’असेही दरेकर यावेळी म्हणाले.
भाजप शिवसेने एकमेकांपासून खूप दूर गेले-मुनगंटीवार
‘फक्त एका बैठकीने शिवसेना-भाजपची युती होईल असे वाटत नाही. त्यासाठी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची एकत्र बैठक होण्याची गरज आहे. परंतू, शिवसेना-भाजप एकमेकांपासून खूप दूर गेल्याने एकत्र येण्यासाठी सध्या वातावरणही नाही आणि परिस्थितीही तशी नाही’, अशी प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.