साखरवाडीच्या श्री दत्त इंडिया साखर कारखान्याचा दुसर्‍या हंगामातील रोलर पूजनाचा कार्यक्रम संपन्न

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण : श्री दत्त इंडिया प्रा. लि., साखरवाडी, ता.फलटण या साखर कारखान्याच्या सन 2020-21 दुसर्‍या हंगामातील मिल रोलर पूजनाचा कार्यक्रम महाराष्ट्र विधानपरिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर व श्रीकृष्ण देवस्थान ट्रस्ट, फलटणचे महंत श्री. विद्वांस श्यामसुंदर शास्त्री यांच्या हस्ते समारंभपूर्वक संपन्न झाला. यावेळी दत्त इंडियाच्या कार्यकारी संचालिका प्रीती रूपारेल, संचालक जितेंद्र धारू, परीक्षित रूपारेल, प्रीया रूपारेल, उद्धव रूपारेल, जयकुमार धारू, चेतन धारू यांची उपस्थिती होती.

श्री दत्त इंडिया प्रा. लि., साखरवाडीचे व्हा. प्रेसिडेंट मृत्युंजय शिंदे यांनी उपस्थितांचे स्वागत केल्यानंतर प्रास्ताविकात सन 2020-2021 या कंपनीच्या दुसर्‍या गळीत हंगामात 6 लाख मे.टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून त्याद़ृष्टीने कारखाना मशिनरीचे नूतनीकरण व दुरुस्ती देखभाल आदी कामे वेगात सुरू असल्याचे नमूद केले. प्रतिदिन गाळप क्षमता आणि 6 लाख मे. टन गाळपाचे उद्दिष्टपूर्ततेच्या दृष्टीने व्यवस्थापनाने ऊस तोडणी वाहतूक यंत्रणेचे करार पूर्ण करून अ‍ॅडव्हान्स वाटप केले आहे. त्याचप्रमाणे कार्यक्षेत्रातील उसाच्या नोंदी मोठ्या प्रमाणावर झाल्या असल्याने 6 लाख मे. टन उद्दिष्टपूर्तीमध्ये कोणतीही अडचण येणार नसल्याचे मृत्युंजय शिंदे यांनी स्पष्ट केले. 

मागील वर्षीचा पहिलाच गळीत हंगाम सरू करण्यास पुरेसा अवधी मिळाला नाही. तरीही सर्व दुरुस्ती देखभाल व अन्य व्यवस्था करून सन 2019-20 चा कंपनीचा पहिला गळीत हंगाम सर्व अधिकारी, कामगार, ऊस उत्पादक शेतकरी, तोडणी वाहतूक कंत्राटदार, व्यापारी व कार्यक्षेत्रातील हितचिंतकांच्या अत्यंत मोलाच्या सहकार्यामुळे यशस्वीरित्या पार पाडण्यात यश आले. गतवर्षी 2.60 लाख मे.टन उसाचे गाळप करून कारखान्याचा सरासरी साखर उतारा 11.51 टक्के इतका मिळाला असून कंपनीने उसाची संपूर्ण रक्कम जाहीर केल्याप्रमाणे ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आल्याचे संचालक जितेंद्र धारू यांनी सांगितले. कारखाना कार्यक्षेत्रामध्ये पुढील गळीत हंगाम सन 2021-22 साठी नवीन ऊस लागणी सुरू झाल्या असून ऊस उत्पादक शेतकर्‍यांनी सदर नोंदी ज्या त्यावेळी कारखान्याच्या शेती विभागाकडे कराव्यात. यावर्षीच्या हंगामात ऊस तोडणी कार्यक्रम ऊस जातनिहाय व रिकव्हरी प्रमाणे करून गळितास आणणार असल्याचे संचालक जितेंद्र धारू यांनी सांगितले व आभार प्रदर्शन केले.

या कार्यक्रमास फलटण पंचायत समितीचे माजी सभापती शंकरराव माडकर, सौ. रेश्मा भोसले, श्रीराम साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन नितीन शाहूराज भोसले, साखरवाडीचे उपसरपंच समीर भोसले, सतीश माने, दत्त इंडिया कंपनीचे जनरल मॅनेजर शरद मोरे, अमोल शिंदे, अजित जगताप, महेश जोशी, भरत तावरे, सदानंद पाटील, चीफ इंजिनिअर किरण पाटील, चीफ केमिस्ट नागेश पवार, सर्व अधिकारी कामगार ऊस उत्पादक शेतकरी, कारखाना हितचिंतक व कंत्राटदार उपस्थित होते.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!