![](https://i0.wp.com/sthairya.com/wp-content/uploads/2021/01/Shivendraraje_2.jpg?resize=780%2C470&ssl=1)
स्थैर्य, सातारा, दि.०७: अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचा २०२०-२०२१ चा गळीत हंगाम वैशिष्ट्यपूर्ण व यशस्वीपणे संपन्न झाला. या हंगामामध्ये कारखान्याने ७,३१,६६९ मे.टन ऊसाचे गाळप करून ८,७२,६६० क्विंटल साखरेचे उत्पादन केले असून सरासरी साखर उतारा १२.८२% इतका प्राप्त झाला. या गाळप हंगामाची वैशिष्टये म्हणजे या हंगामात निघालेला सरासरी साखर उतारा हा जिल्हयामध्ये सर्वाधिक साखर उतारा आहे. तसेच या हंगामात झालेले एकूण ऊस गाळप ७,३१,६६९ मे.टन हे अजिंक्यतारा कारखान्याचे इतिहासातील सर्वाधिक व उच्चांकी गाळप आहे. तसेच शेतकऱ्यांच्या गाळपास येणाऱ्या ऊसाला दर १० दिवसांप्रमाणे ऊसाचे बिल आदा करणारा अजिंक्यतारा कारखाना हा महाराष्ट्रात पहिला कारखाना आहे. या हंगामाकरिता केंद्र शासनाने निर्धारीत केलेल्या एफ.आर.पी सूत्रानुसार आपले कारखान्याची एफ.आर.पी. प्रति मे.टन रूपये ३०४३/- इतकी निघालेली असून चालू सिझनमध्ये गाळपास आलेल्या ऊसाला पहिला ऍडव्हान्स हप्ता प्रति मे.टन रूपये २६००/- प्रमाणे ऊसाचे पेमेंट वेळेतच आदा करण्यात आलेले आहे. सिझनमध्ये असे एकूण रूपये १९० कोटी २३ लक्ष ४२ हजार इतके पेमेंट आदा करण्यात आलेले आहे.
यावेळी कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले की, सध्या पावसाळा सुरू झाला असल्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक अडचण विचारात घेता शेती मशागत, बि-बियाणे, रासायनिक खत खरेदी इत्यादीसाठीची रक्कम शेतकऱ्यांच्या वेळीच उपयोगी पडावी यासाठी एफ.आर.पी. तील उर्वरित देय रक्कम प्रति मे.टन रूपये ४४३/- पैकी प्रति मे.टन रूपये २००/- प्रमाणे दुसरा ऍडव्हान्स् हप्ता शेतकऱ्यांचे बँक खाती वर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या हंगामात झालेले एकूण गाळप ७,३१,६६९ मे.टन विचारात घेऊन दुसऱ्या हप्त्यापोटी प्रति मे.टन रूपये २००/- (विनाकपात) प्रमाणे होणारी एकूण रक्कम रूपये १४ कोटी ६३ लक्ष ३३ हजार ९५२ इतकी रक्कम आज तारखेस संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खाती वर्ग केली असल्याचे सांगितले. यावेळी कारखान्याचे चेअरमन सर्जेराव सावंत, व्हा.चेअरमन विश्वास शेडगे, संचालक रामचंद्र जगदाळे (भाऊ), राजाराम जाधव, यशवंतराव साळुखे, इंद्रजित नलवडे व कार्यकारी संचालक संजीव देसाई हे उपस्थित होते.