दैनिक स्थैर्य । दि. १२ जून २०२३ । मुंबई । कल्याण-डोंबिवलीतील भाजपा नेत्यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला लोकसभा निवडणुकीत सहकार्य करणार नाही अशी भूमिका घेतलेली आहे. यामुळे खुद्द एकनाथ शिंदेंचा मुलगा श्रीकांत शिंदेंची जागा धोक्यात आली आहे. असे असताना विविध मतदारसंघांत भाजपाचे स्थानिक नेते आपलाच दावा करत असल्याने शिंदे गटातील आमदार, खासदारांमध्ये खळबळ उडाली आहे. यावर आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर खुलासा केला आहे.
वेगवेगळ्या ठिकाणचे नेते जर काही दावे करत असतील, आम्हाला सांगत असतील तरी त्यात काही तथ्य नाहीय. लोकसभेचे जागावाटप हे केंद्रीय पार्लिअमेंट्री बोर्ड करणार आहे. एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत केंद्रीय पार्लिअमेंट्री बोर्ड पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात जागावाटपाचा निर्णय घेणार आहे, असे बावनकुळे म्हणाले.
कल्याणमधील भाजपा पदाधिकाऱ्यांनी शिंदेंच्या मंत्रिमंडळात मंत्री असलेल्या रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत शिवसेनेला येत्या लोकसभेसाठी मदत करणार नसल्याचा ठराव केला होता. यामुळे शिंदे गट आणि भाजपात कलगीतुरा रंगला होता. श्रीकात शिंदे यांनी आपण राजीनामा देतो असे वक्तव्य केले होते. यामुळे शिंदेंच्या मतदारसंघात अशी परिस्थिती असेल तर इतर मतदारसंघांत काय असेल असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे. या पार्श्वभूमीवर बावनकुळेंनी भाजपातील बंडावर वक्तव्य केले आहे.