
दैनिक स्थैर्य । 29 जून 2025 । सातारा । जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला चालणार देणारा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रस्ताव दिलेल्या धोम धरणात सी प्लेन सेवेस मान्यता मिळाली आहे. केंद्र सरकारच्या ’उडान 5.5’ या महत्त्वाकांक्षी योजनेतून ही सेवा सुरू होणार आहे. त्यामुळे महाबळेश्वर, तापोळ्यापाठोपाठ धोम धरण परिसरातही पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे.
जिल्ह्यात सध्या पर्यटन विकासाला चालना देणारे प्रकल्प होत आहे. या पार्श्वभूमीवर वाई तालुक्यातील धोम धरणात ’सी प्लेन’ सेवा सुरू करण्याबाबत खासदार उदयनराजे भोसले यांनी डिसेंबर 2024 मध्ये केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हवाई वाहतूक मंत्रालयाला निवेदन दिले होते. सातारा लोकसभा मतदारसंघात विकासात्मक पर्यटन रोजगाराची प्रचंड संधी आहे.खासदार उदयनराजेंच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत केंद्र सरकारच्या उडान 5.5 या महत्त्वाकांक्षी योजनेत या प्रकल्पाचा समावेश केला असून, त्याअंतर्गत धोम धरणात सी-प्लेन सुरू करण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे उदयनराजे भोसले यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. त्यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. आता जिल्ह्याच्या पर्यटनाला आणि दुर्गम भागातील स्थानिकांच्या अर्थकारणाला चालना मिळणार आहे.
महाबळेश्वर तालुक्यातील भूमिपुत्र आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने नवीन महाबळेश्वरचा आराखडाही तयार केला आहे. त्यात अनेक प्रकल्प आणि सुविधांचा समावेश आहे. त्याच्याही अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे. शिवसागर जलाशयाच्या आतील गावांना तापोळा, महाबळेश्वरशी जोडणार्या केबल स्टँड पुलांचे कामही प्रगतिपथावर आहे. वांद्रे-वरळी सी लिंकच्या धर्तीवर होणार्या या पुलावर प्रेक्षा गॅलरी असणार आहे.राज्य शासनाने जावळी तालुक्यातील मुनावळे या गावात जलक्रीडा पर्यटन विकास प्रकल्प केला आहे, तसेच शिवसागर जलाशयामध्ये जागतिक स्तरावरील जलपर्यटनाची योजना देखील मंजूर केली आहे. त्याचेही काम सुरू आहे.
या जलपर्यटन विकासाच्या जोडीला, सुमारे 900 चौरस किलोमीटर अशा विस्तीर्ण शिवसागर जलाशयात आणि सुमारे 20 चौरस किलोमीटरच्या धोम जलाशयातून उड्डाण किंवा पाण्यावर उतरणारी ’सी प्लेन’ उपक्रम सुरू करण्याबाबत केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाने योजना राबवावी, अशी मागणी खासदार उदयनराजेंनी केली होती, तसेच हा उपक्रम राबविल्यास याठिकाणी आपोआप नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असे नमूद केले होते.