
स्थैर्य, सातारा, दि.११: जिल्हा परिषदेची नोंदणी न करता दवाखाना चालवून कोविडसदृश सर्दी, ताप (fever), खोकला (cough) इत्यादी लक्षणे असणाऱ्या रुग्णांवर परवानगी नसताना व आरोग्य विभागाला न कळविता परस्पर उपचार करणाऱ्या मेढा येथील एका डॉक्टरच्या दवाखान्यावर आरोग्य विभागाने छापा टाकत कारवाई केली. यात संबंधित डॉक्टरचा दवाखाना सील करण्यात आला.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मेढ्यातील एक डॉक्टर जिल्हा परिषदेची परवानगी न घेता दवाखाना चालवत होता. कोरोना काळात जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश डावलून कोरोनासदृश लक्षणे सर्दी, ताप, खोकला असणाऱ्या रुग्णांवर आरोग्य विभागाला न कळविता उपचार करत होता. याबाबत आरोग्य विभाग, तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रारी आल्या होत्या. त्यानुसार संबंधित डॉक्टरच्या दवाखान्यावर प्रांताधिकारी सोपान टोम्पे, तहसीलदार राजेंद्र पोळ, गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी छापा टाकून डॉक्टरची चौकशी केली. या चौकशीत या दवाखान्याने जिल्हा परिषदेची मान्यता घेतली नसून, नोंदणी केली नसल्याचे आढळून आले आहे, तसेच बायोमेडिकल वेस्ट ऍक्टचे नोंदणी प्रमाणपत्र मुदतबाह्य असल्याचे आढळले.
ओपीडी रजिस्टर उपलब्ध नाही. फायर ऑडिट प्रमाणपत्र नाही, तसेच या डॉक्टरची होमिओपॅथीची पदवी असताना दवाखान्यात अलोपॅथी औषधांचा साठा मोठ्या प्रमाणात आढळून आला. हा दवाखाना रहिवासी इमारतीत एका फ्लॅटमध्ये सुरू होता. इत्यादी बाबी या दवाखान्याचा पंचनामा करताना आढळून आल्याने केळघर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन गुंड यांनी पंचनामा करून दवाखाना सील केला आहे.
यापुढे तालुक्यातील इतर खासगी डॉक्टरांच्या दवाखान्याची तपासणी करण्यात येणार आहे. यात दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे डॉ. नितीन गुंड यांनी सांगितले.