दैनिक स्थैर्य । दिनांक 06 जुलै 2021 । फलटण । सातारा जिल्हाधिकार्यांनी पारीत केलेल्या लॉकडाऊनच्या निर्बंधाचे उल्लंघन केल्याप्रकरणी फलटण शहरातील जिंती नाका परिसरातील चार दुकानांवर आज दिनांक 6 जुलै रोजी फलटण नगरपालिका व फलटण शहर पोलीस प्रशासनाने कारवाईचा बडगा उचलत सदरची दुकाने सील केली असल्याची माहिती, फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी दिली.
सातारा जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार केवळ अत्यावश्यक सुविधांमध्ये येणारी दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी असताना सदर नियमाचे उल्लंघन करुन जिंती नाका परिसरात अत्यावश्यक सुविधांमध्ये न येणारी दुकाने सुरु असल्याची माहिती मिळाल्यानंतर पालिका व पोलीस प्रशासनाने सदरची दुकाने सील केली आहेत. या कारवाईत मुख्याधिकारी संजय गायकवाड, फलटण शहर पोलीस निरीक्षक भारत किंद्रे, सहाय्यक मुख्याधिकारी तथा कार्यालयीन अधिक्षक मुस्ताक महात यांच्यासह पालिका अधिकारी, कर्मचारी यांनी सहभाग घेतला.
फलटण शहरात विविध ठिकाणी छुप्या पद्धतीने दुकाने सुरु ठेवण्यात येत असल्याचे निदर्शनास येत आहे. पालिकेच्या भरारी पथकाची गाडी आली की दुकाने बंद केली जातात व गाडी निघून गेली की पुन्हा दुकाने सुरु केली जातात असे लक्षात येत असल्याने असा प्रकार निदर्शनास आल्यास जिल्हाधिकार्यांचे पुढील आदेश येईपर्यंत सदरचे दुकान सील करण्यात येणार आहे. याची सर्व व्यापार्यांनी नोंद घेवून प्रशासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी केले आहे.