रासायनिक तंत्रज्ञान संस्थेतून ‘नोबेल’ मिळविणारे वैज्ञानिक घडावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०३ ऑक्टोबर २०२१ । मुंबई । देशाच्या वैज्ञानिक विकासात रासायनिक तंत्रज्ञान संस्थेचे योगदान फार मोठे राहिले आहे. इनोव्हेशन व इनक्युबेशनवर भर देत असताना संस्थेच्या माध्यमातून नवनवे  संशोधन व्हावे, दरवर्षी देशाला नवे पेटंट मिळावे व नोबेल पारितोषिक मिळवून देणारे वैज्ञानिक घडावे, अशी अपेक्षा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी व्यक्त केली.

राज्यपाल कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत रासायनिक तंत्रज्ञान संस्थेचा ८८ वा वर्धापन दिन साजरा झाला, त्यावेळी उपस्थितांना तसेच दूरस्थ माध्यमातून उपस्थित अध्यापक व विद्यार्थ्यांना संबोधन करताना ते बोलत होते.

युवा संशोधक व वैज्ञानिकांनी केवळ चांगली नोकरी मिळावी इतकीच आकांक्षा न ठेवता नवसृजन व नवनिर्मितीचे ध्येय्य बाळगावे व त्या दृष्टीने कठोर परिश्रम करावे असे राज्यपालांनी सांगितले. जागतिक कोरोना संकटाच्या काळात प्रतिबंधक लस शोधून तसेच जगालाही लस उपलब्ध करून देऊन भारताचा गौरव वाढविल्याबद्दल राज्यपालांनी देशातील वैज्ञानिक समुदायाचे अभिनंदन केले.

राज्यपालांच्या हस्ते यावेळी संस्थेच्या प्रोसेस इनोव्हेशन सेंटर व स्नातक विद्यार्थी प्रयोगशाळेचे तसेच फॅकल्टी डेव्हलपमेंट केंद्राचे उद्घाटन झाले.

कार्यक्रमाला संस्थेचे कुलपती डॉ रघुनाथ माशेलकर, माजी कुलगुरु प्रा. जे. बी. जोशी आणि माजी कुलगुरु डॉ जे. डी. यादव ऑनलाइन माध्यमातून उपस्थित होते, तर विद्यमान कुलगुरू प्रा. अनिरुद्ध पंडित, कुलसचिव प्रा. राजेंद्र देशमुख, विविध विभागांचे अधिष्ठाता, विभाग प्रमुख व प्राध्यापक राज्यपालांसमवेत संस्थेच्या सभागृहात उपस्थित होते.

यावेळी थिरूवनंतपुराम येथे कार्य करीत असलेले डॉ. सुरज सोमण यांना ‘अल्कील अमिन्स आयसीटी स्थापना दिवस युवा वैज्ञानिक पुरस्कार’ दूरस्थ माध्यमातून प्रदान करण्यात आला.


Back to top button
Don`t copy text!