सोमवार दि. 24 जानेवारीपासून राज्यातील शाळा सुरू करण्यास परवानगी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.२० जानेवारी २०२२ । मुंबई । राज्यातील पूर्व प्राथमिक ते बारावी पर्यंतच्या सर्व वर्गांच्या शाळा सोमवार दि. 24 जानेवारीपासून सुरू करण्याच्या प्रस्तावास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षितता ही प्राथमिकता लक्षात घेऊन शाळा सुरू करताना कोविड-19 संदर्भात वेळोवेळी जारी करण्यात आलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत.

राज्यात कोविड-19 चा प्रादुर्भाव कमी होत असल्याने शाळा सुरू करण्याबाबत शालेय शिक्षण विभागाने मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव दिला होता. त्यास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे. या अनुषंगाने स्थानिक परिस्थितीचा सातत्याने आढावा घेऊन त्यानुसार निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यासाठी पालकांची परवानगी आवश्यक राहणार आहे. तथापि कोणाचेही शिक्षण थांबू नये हा प्रयत्न असल्याचे प्रा.गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.

शाळा सुरू करताना सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण झालेले असणे बंधनकारक आहे. त्याचबरोबर 15 ते 18 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी प्रशासनाबरोबरच शाळा व्यवस्थापनाने प्रयत्न करावेत, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्र्यांनी दिले आहेत.


Back to top button
Don`t copy text!