
दैनिक स्थैर्य । दि. १५ फेब्रुवारी २०२३ । पुणे । लोकशाहीच्या बळकटीसाठी कायद्याची भूमिका महत्वाची आहे. या देशात कायदा सर्वश्रेष्ठ आहे. अशा वेळेस कायद्याचे शिक्षण घेणार्या युवकांनी लोकशाहीच्या बळकटीसाठी चांगल्या उद्देशाने राजकारणात सक्रिय सहभाग घ्यावा असे प्रतिपादन आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले.
माईर्स एमआईटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी संचलित विधी महाविद्यालय, पुणेच्या वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी एमआयटी वर्ल्डपीस युनिव्हर्सिटी कार्यकारी अध्यक्ष राहुल कराड, कुलगुरु डॉ. आर. एम. चिटणीस, कुलसचिव गणेश पोकळे, विधी महाविद्यालय प्रमुख डॉ. पौर्णिमा इनामदार, डॉ. अश्विनी पंत, डॉ. कल्पना जायस आणि विद्यार्थी प्रतिनिधी अनिश खडे उपस्थित होते.
आ. श्रीमंत रामराजे म्हणाले, संविधानात्मक मूल्यांचा अंगीकार प्रत्येकाने स्वीकारावा. महाराष्ट्राची विधान परिषद ही सर्वोत्तम काम करणारी आहे. वर्तमान काळात लोकहिताचे कायदे व धोरण बनवून त्याचे पालन करावे. तंत्रज्ञान व मानव यांच्या परस्पर संबंधांचे कायदे तयार करणे व व्यवस्था राखणे हे कायद्याचे शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांसमोर मोठे आव्हान आहे, त्यामुळे नैतिकमूल्ये व विवेक जोपासणे आवश्यक आहे.
राहुल कराड म्हणाले, या देशापुढे जातीयता, गुन्हेगारी, सामुदाय कलह आणि भ्रष्टाचार हे सर्वात मोठे आव्हान आहे, त्यासाठी कडक कायदे आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. प्रा. डॉ. चयनिका बासू यांनी सूत्रसंचालन, डॉ. अभिजित ढेरे यांनी आभार मानले.