स्थैर्य, दि.३१: राज्यातील काही भागांमध्ये नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आलेले आहेत. आता पुण्यातील शाळा सुरू होणार आहेत. यासोबतच नागपुरातील सुरू केल्या जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्तांनी दिली आहे. चार जानेवारीपासून येथील वर्ग सुरू होणार आहे. तर ठाणे आणि मुंबईतील शाळा या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे 16 जानेवारीनंतरच सुरू होतील.
चार जानेवारीपासून शाळा होणार सुरू
नागपुरातील शाळा या चार जानेवारीपासून सुरू होणार आहेत. आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी याविषयीचे आदेश काढलेले आहेत. दरम्यान अटींची पूर्तता करुन मगच शाळा सुरू करता येणार आहे. संस्थाचालकांना या अटींचे पालन करावे लागणार आहे. विशेष म्हणजे शिक्षकांना आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल शाळा व्यवस्थापन समितीकडे सादर करावा लागणार आहे. यामुळे त्यांना आता पुन्हा चाचणी करावी लागणार आहे.
पुण्यातील शाळाही चार जानेवारीपासून होणार सुरू
यासोबतच पुणे महापालिका क्षेत्रामधील सर्व शाळांमधील नववी ते बारावीचे वर्ग 4 जानेवारीपासून केले जाणार आहे. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी याविषयी जाहिर केलेले आहे. दरम्यान सर्व अटींचे पालन करुन मगच शाळा सुरू करण्याची परवानगी दिली जाणार आहे.
ठाण्यातील शाळा 16 जानेवारीपर्यंत बंद
जागतिक स्तरावर कोरोना विषाणू प्रादुर्भाव पुन्हा वाढत आहे. या परिस्थितीत सतर्क राहणे आवश्यक आहे. यामुळे ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळा 16 जानेवारी 2021 पर्यंत बंद ठेवण्यात याव्या असे आदेश ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकरांनी दिले आहे. त्यामुळे नवी मुंबई शहरातील सर्व शाळा 16 जानेवारीपर्यंत बंदच राहणार आहेत. तर ऑनलाइन शाळा पुर्वीप्रमाणेच सुरू राहतील.
मुंबईतील शाळा 15 जानेवारीपर्यंत बंद
दरम्यान मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व सरकारी आणि खासगी शाळा-महाविद्यालये 15 जानेवारीपर्यंत बंद राहतील. यापूर्वी 31 डिसेंबर 2020 पर्यंत सर्व शाळा आणि महाविद्यालय बंद ठेवले जाणार होते. मात्र, ब्रिटनमध्ये आढळलेल्या नव्या कोरोना विषाणूमुळे धोका वाढला आहे. यामुळे खबरदारी म्हणून 15 जानेवारीपर्यंत शाळा या बंदच असतील.