शाळकरी मुलीचे अपहरण करत मारहाण


स्थैर्य, सातारा, दि. 9 सप्टेंबर : सातार्‍यात 9 वर्षांची मुलगी शाळेतून घरी जात असताना अज्ञाताने तिचे अपहरण करून तिला मारहाण केली. मुलगी मदतीसाठी ओरडल्याने संशयिताने तेथून पलायन केले. दरम्यान, मुलगी जखमी झाली असून ती घाबरून गेली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, 9 वर्षांची मुलगी शाळेतून घरी निघाली होती. त्यावेळी मंगळवार पेठेत परिसरात संशयित युवक तेथे आला. त्याने मुलीला दुचाकी ओढण्याच्या बहाण्याने पार्कींगमध्ये बोलावले. तेथे संशयिताने मुलीचे अपहरण केले व तिच्या गळ्याला पकडले.

या घटनेमुळे मुलगी घाबरली. मुलीने जीव वाचवण्यासाठी प्रतिकार केला व जोरात ती ओरडली. या घटनेत मुलगी बेशुद्ध पडली. पार्किंगच्या पाठीमागे असलेल्या बोळात संशयिताने मुलीला फेकले. या घटनेत मुलीच्या अंगावर प्लायवूड पडल्याने ती जखमी झाली.लहान मुलीचा ओरडण्याचा आवाज झाल्याने परिसरातील नागरिकांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली. तोपर्यंत संशयित तेथून पसार झाला. लहान मुलगी बोळात, अडगळीत निपचित पडल्याचे नागरिकांना दिसल्यानंतर त्यांनी तिला बाहेर काढले.

मुलीच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती कळवण्यात आली. ते आल्यानंतर मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.या घटनेची माहिती शाहूपुरी पोलिसांना समजल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस ठाण्यात अज्ञातावर अपहरणाचा व मारहाण केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.


Back to top button
Don`t copy text!