शाळेतील टीव्ही चोरणारी टोळी गजाआड; शेरे येथे कराड तालुका पोलिसांची कारवाई; तीन दिवस पोलीस कोठडी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २२ सप्टेंबर २०२१ । कराड । शेरे जिल्हा परिषद शाळेतून सहा एलईडी टीव्ही चोरणाऱ्या पाच संशयितांना कराड पोलिसांनी अटक केली आहे. रविवार दि. 19 रोजी रात्री ही कारवाई केली. संशयितांकडून पोलिसांनी 2 टीव्ही जप्त केले आहेत. संशयितांना सोमवारी न्यायालयात हजर केले असता तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

ऋतुराज संजय निकम (वय 20), अजिंक्य संजय गावडे (वय 19), रोहित अरुण सावंत (वय 19), धनराज बाबुराव मोटे (वय 25, सर्व रा. शेरे, ता. कराड) व आकाश प्रभाकर शेळके (वय 21, रा. कार्वे, ता. कराड) अशी पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, शेरे येथील जिल्हा परिषद शाळेला ग्रामपंचायतीने जानेवारी 2020 मध्ये सहा एलईडी टीव्ही दिले आहेत. दरम्यानच्या कालावधीत शाळा बंद असताना संशयितांनी शाळेच्या वर्गखोल्यांमध्ये लावलेले टीव्ही चोरट्यांनी चोरून नेले. चोरलेल्या टीव्हीची कार्वे येथे दोन, तुळसण येथे एक, जत येथे एक अशी विक्री केली. तीन ऑगस्ट 2021 रोजी ही बाब लक्षात आल्यानंतर शाळेचे शिक्षक प्रकाश फल्ले यांनी याबाबतची तक्रार कराड तालुका पोलीस ठाण्यात दिली होती. या तक्रारीवरून तपास करत असताना मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी शेरे येथील चार व कार्वे येथील एकाला अटक केली. त्यांना सोमवार दि. 20 रोजी न्यायालयासमोर हजर केले असता तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. अधिक तपास मिलींद बैले करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!