शाळा सुधार कार्यक्रमामुळे जि.प.शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावेल – उपमुख्यमंत्री अजित पवार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०६ मे २०२२ । पुणे । उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शाळा सुधार कार्यक्रमांतर्गत तयार करण्यात आलेल्या आचार्य विनोबा भावे ॲपचे उद्घाटन करण्यात आले. शाळा सुधार कार्यक्रमामुळे जिल्हा परिषद शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावेल आणि विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळेल, असा विश्वास श्री.पवार यांनी यावेळी व्यक्त केला.

विधानभवन पुणे येथे झालेल्या या कार्यक्रमाला विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, संजय दालमिया आदी उपस्थित होते.

श्री.पवार म्हणाले, शाळा सुधार कार्यक्रमामुळे शाळांमधील सुविधांचा दर्जा उंचावण्यासोबतच शिक्षणाचा दर्जाही उंचावण्यास मदत होईल. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेविषयी आकर्षण निर्माण होईल आणि पालकांचा जिल्हा परिषद शाळांवरील विश्वास वाढण्यास मदत होईल. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनामुळे अध्यापन पद्धतीतही अनुकूल बदल घडवून आणता येतील.

पुणे जिल्हा परिषदेत सेवा देणाऱ्या शिक्षकांसाठी आचार्य विनोबा भावे अॅप श्री. दालमिया यांनी विकसित केले असून ते जिल्हा परिषदेला नि:शुल्क उपलब्ध करून देण्यात आले आहे. अॅप अंतर्गत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जिल्हाभरातील शिक्षकांना एकमेकांशी संवाद साधण्यास मदत होणार आहे. चांगल्या उपक्रमांची देवाण-घेवाणदेखील ॲपच्या माध्यमातून होऊ शकेल. अध्यापन साहित्य, नवीन अध्यापन पद्धती आदी माहिती मिळण्यासोबत डिजिटल लर्निंगसाठीच्या सुविधांचे मुल्यांकन आणि वापर करण्यासाठी ॲपचा चांगला उपयोग होईल.

पुणे जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेला शिक्षकांना मार्गदर्शन, पाठ योजना तयार करणे, प्रशिक्षण सामग्री पद्धतशीरपणे सामायिक करणे आदींसह शिक्षकांच्या  मूल्यमापनासाठी ॲपचा उपयोग होईल. ॲपद्वारे प्रशासन माहिती  संकलित करू शकते आणि शिक्षकांना विविध उपक्रमांची माहिती देऊ शकणार आहे.


Back to top button
Don`t copy text!