दैनिक स्थैर्य । दि. ०८ जानेवारी २०२३ । सातारा । महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात प्रथम आलेले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निनाम येथील विद्यार्थीनी जागृती जाधव तसेच सातारा येथील अणासाहेब कल्याणी विद्यालयातील विद्यार्थी अथर्व पवार यांचा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
जिल्ह्यातील या दोन विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत मिळविलेले हे यश म्हणजे सातारा जिल्ह्याचा बहुमान असल्याचे सांगून, शालेय शिक्षण मंत्री श्री. केसरकर म्हणाले, या विद्यार्थ्यांचे पालक व शिक्षक यांनी यांच्या शिक्षणासाठी घेतलेल्या कष्टाचे चिज झाले आहे. या यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करतो.
जिल्हा परिषद शाळा निनाम येथील विद्यार्थीनी जागृती जाधव हीने पूर्व उच्च प्राथमिक पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात प्रथम येण्याचा मान मिळविल आहे. तर अणासाहेब कल्याणी विद्यालयातील विद्यार्थी अथर्व पवार हा पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा आठवीच्या परीक्षत राज्यात प्रथम आला आहे.
यावेळी शालेय शिक्षणमंत्री श्री. केसरकर यांनी जलमंदीर पॅलेस येथे शिवसृष्टीबाबत आढावा घेतला. लिंब येथे उभारण्यात येणाऱ्या या शिवसृष्टीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा संपूर्ण जीवनपट कशापध्दतीने उभारण्यात येणार आहे याविषयी चर्चा केली. यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, पोलीस अधिक्षक समीर शेख, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, श्रीमंत छत्रपती राजमाता कल्पनाराजे भोसले, सातारा प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, तहसिलदार राजेश जाधव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.