स्थैर्य, सातारा दि.26 : ‘जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद’ भी असे ब्रीद सार्थ करणार्या भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या ( सातारा विभाग ) गोल्डन ज्युबिली ट्रस्टच्या वतीने कोडोली येथील परम प्रसाद चॅरिटेबल ट्रस्ट संचलित आशाभवन या मतिमंद मुलांच्याशाळेला नव्या कोर्या स्कूल बसची भेट देण्यात आली.
यावेळी भारतीय आयुर्विमा महामंडळाचे चेअरमन एम आर कुमार यांच्या वतीने स्कूल बसची चावी आशा भवन चे संचालक फादर अनिष जोसेफ यांना सुपुर्द करण्यात आली. फादर सँन्डो सेबेस्टियन, फादर सोबीन कुरूविल्ला, सिस्टर मरलिन, सामाजिक कार्यकर्ते रूपेश उबाळे यावेळी उपस्थित होते. भारतीय आयुर्विमा महामंडळ पश्चिम विभाग क्षेत्रीय प्रबंधक सी .विकास राव, सातारा विभागाचे वरिष्ठ मंडल प्रबंधक ललित कुमार वर्मा, विपणन व्यवस्थापक सातारा विभाग अजय सपाटे, विक्री व्यवस्थापक राजन नार्वेकर यांच्या विशेष उपस्थितीत हा स्कूल बस वितरण सोहळा पार पडला .
आयुर्विमा महामंडळ सातारा विभागाने नेहमीच सामाजिक बांधिलकी जोपासली आहे .विशेषतः सामाजिक संस्था व शाळांना मदत करण्यात आयुर्विमा महामंडळ सातारा नेहमीच आघाडीवर असते . कोयना खोर्यातील शिरवली आपटी येथील शाळांच्या इमारती एलआयसीच्या वतीने बांधून देण्यात आल्या . सातार्यातील समता शिक्षण प्रसारक मंडळाच्या शाळेनंतर कोडोली येथील परमप्रसाद चॅरिटेबल ट्रस्ट संचलित आशा भवन स्कूलला नवी कोरी बस सुपुर्द करण्यात आली . एलआयसी चे ऑल इंडिया चेअरमन एम . आर . कुमार यांनी बसच्या चाव्या संस्था संचालकांना देत शाळेच्या कामकाजाची माहिती घेतली .आशा भवन शाळेत अनेक अनाथ मुले शिक्षण घेत असून या परिसरात राहणार्या मुलांना आयुर्विमा महामंडळाच्या मदतीमुळे स्कूल बसची सोय उपलब्ध झाल्याने आम्हाला मोठी मदत झाल्याची कृतकृत्य भावना आशा भवन संचालक फादर अनिष जोसेफ यांनी व्यक्त केली .
या छोटेखानी कार्यक्रमात आयुर्विमा महामंडळाच्या पश्चिम विभागात सर्वाधिक 1100 पॉलीसी करून कोरेगावच्या मनिषा मुळीक यांनी वर्षभरात सहस्त्र वीर होण्याचा मान मिळवला . यानिमित्ताने भारतीय टपाल विभागाच्या मान्यतेने तिकिट प्रकाशन सोहळा एम आर कुमार व सी .विकास राव यांच्या उपस्थितीत करण्यात आला .पश्चिम विभाग क्षेत्रीय प्रबंधक सी .विकास राव यांनी सातारा विभागाच्या कामाचे विशेष कौतुक केले . सातारा विभागाचे सिंगल प्रिमियम बजेट चे उदिष्ट पूर्ण झाल्याचे त्यांनी विशेषत्वाने नमूद केले .विमा व्यवसायाचा महाराष्ट्रासह भारतात वेगाने विस्तार होत आहे . नवीन तरूणांनी कामाची सुवर्णसंधी म्हणून या व्यवसायात पदार्पण करण्याचे आवाहन राव यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केले . सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत या वेळी वृक्षारोपण करण्यात आले.