
दैनिक स्थैर्य | दि. २१ फेब्रुवारी २०२३ | फलटण |
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास व्हावा यासाठी शालेय वार्षिक स्नेहसंमेलने उपयुक्त ठरतात, असे मत फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजीराव बरडे यांनी व्यक्त केले.
महात्मा एज्युकेशन सोसायटीच्या श्रीराम विद्याभवन प्राथमिक शाळा, आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालय आणि सौ.चतुराबई शिंदे बालक मंदिर फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण प्रसंगी तानाजीराव बरडे बोलत होते. स्नेहसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष सुभाषराव शिंदे होते. यावेळी प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप, संस्थेचे सेक्रेटरी रवींद्र बेडकिहाळ, सदस्य बापूसाहेब मोदी, शांताराम आवटे, आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालयाच्या चेअरमन सौ.अलका बेडकिहाळ, पालक प्रतिनिधि सारिका वाघ, सारिका भोई, श्रीमती रोकडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकांनी आमच्या संस्थेवर विश्वास दाखवला आहे, याबद्दल त्यांचे सर्वप्रथम आभार मानतो. मुलांनी सोशल मीडियाच्या जाळ्यात न अडकता शालेय ज्ञान संपादन करण्याबाबतची भूमिका प्रामाणिकपणे पार पाडावी. म्हणजे आयुष्याच्या ठरविलेल्या ध्येयापर्यंत पोहचणे शक्य होते. तसेच अशा कार्यक्रमातून विदयार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो. उद्याचे सुजान नागरीक निर्माण होतात, असे अध्यक्षीय भाषणात सुभाष शिंदे यांनी सांगितले.
प्रारंभी विद्यालयातील शैक्षणिक, कला व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारी कु. सपना नीलेश चुनाडे (प्राथमिक विभाग), कु.आकांक्षा अशोक पवार (माध्यमिक विभाग) हिला राणी लक्ष्मबाई, चि.सोहम विक्रम वाघ (प्राथमिक विभाग), सौरभ तानाजी शिंदे (प्राथमिक विभाग) याला नेताजी सुभाषचंद्र बोस, तर जुही राहुल मंजरतकर हिला जिजाऊ आणि सानिका दीपक पवार (दोन्ही प्राथमिक विभाग) हिला बेस्ट कँडीडेट पुरस्कार देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. याशिवाय वैष्णवी सुरेश शिवदास, आरुष विजय अवघडे, सादिया गुलफाम शेख, दीक्षा नाना गायकवाड, आनुश्री मोहन पवार, पूर्वजा पवन कांबळे, राजवीर केशव मोरे, ऋतवेश पवन कांबळे, उमा मुरलीधर बाबा धराशिवकर, श्रीकांत सचिन कांबळे यांना कला व विज्ञान प्रदर्शनातील विशेष प्रविण्याबद्दल स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज पोवाडा, ‘चंद्रा’ व ‘दिसला ग बाई दिसला’ या लावणी, झिंग झिंग झिंगाट, मैया यशोदा, भुरुम भुरुम, नाचू किती नाचू किती, या नृत्याविष्कारांनी उपस्थितांची मने जिंकली.
श्रीराम विद्या भवनचे मुख्याध्यापक मनीष निंबाळकर यांनी शाळेची प्रगती तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी मिळविलेले विशेष प्राविण्य याची माहिती आपल्या प्रास्ताविकात दिली. भिवा जगताप यांनी आभार मानले.
दिपाली निंबाळकर यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांनी विशेष प्रयत्न केले.