
स्थैर्य, फलटण, दि. २ ऑक्टोबर : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला असून, राज्य निवडणूक आयोगाने बहुप्रतिक्षित आरक्षण सोडतीचा सविस्तर कार्यक्रम जाहीर केला आहे. आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी बुधवारी, दि. १ ऑक्टोबर रोजी याबाबतचे आदेश जारी केले. या कार्यक्रमानुसार, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांसाठी आरक्षणाची प्रत्यक्ष सोडत १३ ऑक्टोबर रोजी काढली जाणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, राज्यातील ३२ जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत येणाऱ्या ३३६ पंचायत समित्यांसाठी ही निवडणूक प्रक्रिया राबवली जात आहे. सदस्य संख्येची निश्चिती आणि प्रभाग रचना यापूर्वीच अंतिम झाली असून, आता आरक्षण निश्चितीचा महत्त्वाचा टप्पा पार पडणार आहे. या घोषणेमुळे फलटण तालुक्यासह राज्यभरातील राजकीय वातावरण तापले असून, इच्छुकांची धाकधूक वाढली आहे.
असा आहे सविस्तर आरक्षण कार्यक्रम:
- १० ऑक्टोबर: नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग आणि महिलांसाठीच्या आरक्षण सोडतीची सूचना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाईल.
- १३ ऑक्टोबर (सर्वात महत्त्वाचा दिवस):
- जिल्हा परिषद निवडणूक गटांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आरक्षण सोडत काढली जाईल.
- पंचायत समिती निर्वाचक गणांसाठी संबंधित तहसील कार्यालयात तहसिलदारामार्फत आरक्षण सोडत काढली जाईल.
- १४ ऑक्टोबर: प्रारुप आरक्षणाची अधिसूचना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत प्रसिद्ध केली जाईल.
- १४ ते १७ ऑक्टोबर: प्रसिद्ध झालेल्या प्रारुप आरक्षणावर नागरिक हरकती व सूचना दाखल करू शकतील.
- ३१ ऑक्टोबर: प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांचा विचार करून विभागीय आयुक्त आरक्षणास अंतिम मान्यता देतील.
- ३ नोव्हेंबर: जिल्हाधिकारी अंतिम आरक्षणाची अधिसूचना महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध करतील.
या कार्यक्रमानंतर प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रमाची घोषणा होण्याची शक्यता असल्याने, फलटण तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षांनी आणि संभाव्य उमेदवारांनी तयारीला वेग दिला आहे. १३ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सोडतीमध्ये कोणते गट व गण आरक्षित होणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.