दहाच्या नाण्यांचा तुटवडा; सामान्यांसह व्यापारी त्रस्त


दैनिक स्थैर्य | दि. २३ सप्टेंबर २०२४ | फलटण |
दहाच्या नोटांनंतर आता नाण्यांचाही कृत्रीम तुटवडा निर्माण झाला आहे. तसेच आता १०, २० व ५० रुपयांच्या नोटांचापण तुटवडा निर्माण झाला आहे, त्यामुळे फलटणमध्ये बाजारपेठेतील ग्राहक व व्यापारी त्रस्त झाले असून शाब्दिक बाचाबाचीही होऊ लागली आहे.

ज्या बँकेत खाते आहे, ती बँकसुध्दा वरील नोटा व कॉईन उपलब्ध करून देत नाही. यावर जाब विचारला तर बँकेचे मॅनेजर – कर्मचारी आपल्या खातेदार व ग्राहकांशी वाद घालतात, नीट बोलत नाहीत, अशी परिस्थिती सध्या बाजारात निर्माण झाली आहे.

ऐन सणांच्या हंगामात दहा रुपयांच्या चलनाच्या तुटवड्यामुळे फलटणमधील व्यापारी व ग्राहक त्रस्त झाले आहेत. अनेक मोठ्या व्यापार्‍यांना दहा रुपयांच्या चलनासाठी बाहेरगावी एक हजार रुपयांना १० रुपये कमिशनचा भुर्दंड सोसावा लागतो; परंतु सध्या तेदेखील मिळत नसल्याने येथे व्यापार्‍यांचीही गैरसोय होत आहे.

ग्रामीण भागातून फलटणमधील बँकेत जाण्यासाठी एक तास वेळ लागतो. त्यातच नोटांच्या व नाण्यांच्या तुटवड्यामुळे बँकेत हेलपाटे मारण्यात व्यापार्‍यांचा व ग्राहकांचा वेळ जात आहे.

बँकेतील कर्मचार्‍यांना सुट्या पैशांअभावी ग्राहकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. सर्वच बँकेत कॅश काऊंटर एकच चालू आहे. सिक्युरिटी गार्ड हा बँकेचा सिक्युरिटी नसून बँकेच्या शिपायाचे काम करताना दिसत आहे. अशामुळेच बँकेत येणार्‍या-जाणार्‍या ग्राहकांवर पाळत ठेवून चोर्‍या होत आहेत.

फलटण बाजारपेठेत ग्राहकांची कामे लवकरात लवकर करून बँकेत आलेला ग्राहक त्वरित बाहेर पडला पाहिजे, अशी अपेक्षा सामान्यांची आहे.


Back to top button
Don`t copy text!