टंचाईत सांगतो, बघतो असली कारण खपवुन घेतली जाणार नाही : आमदार दीपक चव्हाण

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. 06 सप्टेंबर 2023 | फलटण | सध्या फलटण तालुक्यातील काही गावांमध्ये टंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यामध्ये तालुक्यातील कोणत्याही गावामध्ये कोणत्याही गावामधून जर चारा, पाणी आणि महावितरणच्या बाबत जर मागणी झाली आणि ती पूर्ण करताना अधिकाऱ्यांच्याकडून सांगतो, बघतो असली जर कारणे सांगितली गेली तर ती खपवून घेतली जाणार नाही, असे स्पष्ट निर्देश आमदार दीपक चव्हाण यांनी दिले.

फलटण पंचायत समितीच्या सभागृहात आमदार दीपक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पाणी टंचाई आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, माणिकराव सोनवलकर, तहसीलदार डॉ. अभिजित जाधव, गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे, तालुका कृषी अधिकारी सागर डांगे, शेती महामंडळ, निरा उजवा कालवा, धोम – बलकवडी, महावितरणसह विविध विभागांचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महावितरणचे नियोजन आहे तर होणार ना ?

महावितरणच्या माध्यमातून तालुक्यातील विविध पाणी पुरवठा योजनांना वीज पुरवठा होत आहे. यामध्ये जर वीज कनेक्शन कट करण्यात आली. किंवा डीपी जळल्याने तातडीने बसवण्याचे नियोजन करण्यात येते. नेहमीप्रमाणे नुसते नियोजन आहे; परंतु त्याची अंमलबजावणी वेळेमध्ये होत नाही. नियोजन आहे तर ते होणार ना ? असे प्रश्न न होता ते झालेच पाहिजे, असे स्पष्ट निर्देश आमदार दीपक चव्हाण यांनी दिले.

पाणी टंचाईबाबत अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष खपवून घेणार नाही

सध्या तालुक्यामध्ये विविध गावांमध्ये पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. यामध्ये जर तालुक्यातील कोणत्याही गावाकडून विहीर, बोअर अधिग्रहण करण्याची मागणी करण्यात आली किंवा टँकरची मागणी करण्यात आली तर त्याकडे अधिकाऱ्यांनी काटेकोर लक्ष ठेवावे यामध्ये अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष खववून घेणार नाही, असा इशारा आमदार दीपक चव्हाण यांनी यावेळी दिला.

जनावरांना मुबलक चारा उपलब्ध करा

फलटण तालुक्यामध्ये ज्या ठिकाणी पशुधनाला चाऱ्याची आवश्यकता आहे. त्याठिकाणी तातडीने जनावरांना चारा उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाने नियोजन करावे. सध्या तालुक्यात ऊस व मका या पिकाचा चारा उपलब्ध आहे; अशी माहिती तालुका कृषी अधिकारी सागर डांगे यांनी दिल्यावर तालुक्यातील जनावरांना मुबलक चारा उपलब्ध करावा असे निर्देश आमदार दीपक चव्हाण यांनी यावेळी दिले.

डीपी चोरीच्या तक्रारी पोलिसात दाखल करा

फलटण तालुक्यामध्ये विविध ठिकाणचे डीपी चोरीला जात आहेत. डीपी चोरीला गेल्यानंतर त्याठिकाणी तक्रार पोलिसात नोंद होत नसल्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. यामध्ये महावितरणने पोलिसांना पत्र द्यावे. तरी पोलिसांनी यामध्ये गुन्हे दाखल करावेत, अश्या सूचना आमदार दीपक चव्हाण यांनी यावेळी दिल्या.

वन्यजीवांकडून होणाऱ्या चाऱ्याच्या नुकसानीसाठी वनविभागाने उपाययोजना कराव्यात

फलटण तालुक्यामध्ये जे वन क्षेत्र आहे त्यामधील असणाऱ्या वन्यजीवांकडून शेजारी असणाऱ्या शेतीमधील चाऱ्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करत आहेत. यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी वनविभागाकडे सादर करावेत त्यानंतर त्या ठिकाणी होणारे नुकसान टाळण्यासाठी वनविभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात. यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या सभेमध्ये आम्ही मागणी केली होती ती मंजूर सुद्धा करण्यात आली आहे, त्यामुळे यामध्ये वनविभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, असेही आमदार दीपक चव्हाण यांनी स्पष्ट केले.

काटकसरीने पाणी वापरा : तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव

सध्या फलटण तालुक्यामध्ये टंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. तालुक्याच्या काही गावांमध्ये विविध ठिकाणी टँकर सुद्धा सुरू करण्यात आलेले आहेत. यासोबतच तालुक्यामधील काही गावांमध्ये विहिरींचे व बोअरचे अधिग्रहण करण्यात आलेले आहे. या सर्व प्राश्वभूमीवर फलटण तालुक्यामधील नागरिकांनी पिण्याला व शेतीला जे पाणी सोडले जाते ते काटकसरीने वापरणे गरजेचे आहे. ग्रामीण भागामध्ये बऱ्याच ठिकाणी पाण्याच्या टाकीला कॉक बसवण्यात आलेल्या नाहीत. तरी प्रत्येक नागरिकांनी पाण्याच्या टाकीला कॉक बसवून वाया जाणारे पाणी वाचवण्याचे काम करावे. तालुक्यामध्ये टंचाई सदृश्य परिस्थिती असताना स्वतःपासून पाणी बचतीची सवय करावी; असे आवाहन फलटणचे तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांनी केले.

यावेळी फलटण तालुक्यातील सर्व गावांचा पाणी, चारा व टंचाईच्या दृष्टीने इतर बाबींचा सखोल आढावा घेण्यात आला.


Back to top button
Don`t copy text!